मुंबई : शेअर बाजारांनी बुधवारी नवे उच्चांक केले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २८ हजार अंकांना स्पर्श करून थोडासा खाली आला. ५५.५0 अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स आजपर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर २७,९१५.८८ अंकांवर बंद झाला. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या निफ्टीने १४.१५ अंकांची वाढ मिळविताना ८,३३८.३0 अंकांचा आजपर्यंतचा सर्वोच्च बंद दिला.
बँकिंग आणि आयटी क्षेत्रातील कंपन्यांनी मोठी कमाई केली. केंद्र सरकारकडून आणखी सुधारणा राबविल्या जातील तसेच रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपात केली जाईल, अशी आशा बाजाराकडून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर सेन्सेक्स आणि निफ्टी उसळीवर आहे.
५0 कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश असलेल्या एनएसईच्या सीएनएक्स निफ्टीने ८,३६५.५५ अंकांचा इंट्रा-डे उच्चांक गाठला. आधीचा इंट्रा-डे उच्चांक सोमवारी ८,३५0.६0 अंकांचा होता. दिवस अखेरीस थोडासा खाली ८,३३८.३0 अंकांवर तो बंद
झाला.
३0 कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश असलेला बीएसई सेन्सेक्स २८,0१0.३९ अंकांच्या सर्वोच्च पातळीवर गेला होता. सोमवारी तो २७,९६९.८२ अंकांवर पोहोचला होता. ही आजपर्यंतची सर्वोच्च पातळी होती. ती सेन्सेक्सने बुधवारी पार
केली.
शेअर ब्रोकरांनी सांगितले की, केंद्र सरकारने आर्थिक सुधारणा हाती घेतल्याचा चांगला परिणाम बाजारावर दिसून आला आहे. त्याचप्रमाणे ब्ल्यू-चिप कंपन्यांनी दुसऱ्या तिमाहीत उत्तम कामगिरी केल्याने बाजार धारणा मजबूत झाली आहे. केंद्र सरकार कामगार सुधारणा, काही सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण तसेच भूसंपादन कायद्यात दुरुस्ती यांसारख्या सुधारणांकडे लक्ष देणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी वाणिज्य क्षेत्रातील दिग्गजांच्या एका बैठकीत सांगितले आहे. त्याचा योग्य संदेश बाजारात गेला आहे.
केंद्र सरकारने आर्थिक सुधारणांकडे लक्ष दिले असतानाच दुसऱ्या बाजूने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती उतरत आहेत. त्याचा थेट परिणाम म्हणून महागाई कमी होईल. महागाई कमी झाल्यास रिझर्व्ह बँकेच्या चिंता कमी होतील आणि अंतिमत: व्याजदरात कपात होईल. या सकारात्मक साखळीचा बाजाराने लाभ उठविला आहे.
बँकिंग क्षेत्राने आज शेअर बाजारात उत्तम कामगिरी केली. अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, एचडीएफसी यांचे शेअर्स वर चढले. सन फार्मा, इन्फोसिस, टीसीएस आणि आयटीसी या कंपन्यांनाही लाभ मिळाला.
सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनीही उत्तम कामगिरी केली. एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसी यांचे शेअर्स २.३७ टक्क्यांनी वर चढले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती अनेक वर्षांच्या नीचांकी पातळीवर आल्या आहेत. त्याचा लाभ या कंपन्यांना मिळाला. (प्रतिनिधी)
सेन्सेक्सचा २८ हजार अंकांना स्पर्श
शेअर बाजारांनी बुधवारी नवे उच्चांक केले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २८ हजार अंकांना स्पर्श करून थोडासा खाली आला.
By admin | Updated: November 6, 2014 02:41 IST2014-11-06T02:41:46+5:302014-11-06T02:41:46+5:30
शेअर बाजारांनी बुधवारी नवे उच्चांक केले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २८ हजार अंकांना स्पर्श करून थोडासा खाली आला.
