दापोली/दाभोळ : अथकपणे मदतकार्यात गुंतलेले हजारो हात, काळजावर दगड ठेवून ढिगारा उपसणारे स्थानिक ग्रामस्थ आणि जीवाची पर्वा न करता ‘आॅपरेशन’ पार पाडणारे आपत्ती निवारणाचे पथक... दाभोळ टेमकरवाडीतील डोंगराखाली तब्बल ४0 तास दिसणारं हे दृश्य मनावर दणपण आणणारं होतं. कुणीतरी जिवंत सापडेल, या आशेने वळवळणारे डोळे प्रत्येकवेळी निराशाच करत होते. प्रत्येक मृतदेह मिळताना त्यांच्या नातेवाईकांचा बाहेर पडणारा हुंदका आणि दुसरीकडे दु:खं करण्यासही उसंत नसल्याने मदतकार्यात गुंतलेले शेजारी-पाजारी, तरूण... निर्मनुष्य बाजारपेठ असे दृश्य एकेकाळी गजबजलेल्या दाभोळच्या बाजारपेठेपासून ते अगदी टेमकरवाडीपर्यंत दिसत होते. सोमवारी मध्यरात्री अडीच वाजता दाभोळ टेमकरवाडी येथे डोंगर कोसळून तीन घरे जमिनीखाली गाडली गेली. मातीचा मोठ्या प्रमाणावर साचलेला ढिगारा उपसण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक दाभोळमध्ये आठ वाजता दाखल झाले. त्यानंतर पुन्हा कामाला सुरुवात झाली. मात्र वीज नसल्याने व धो धो पाऊस असल्याने आठ वाजल्यानंतर मदतकार्यात अडचणी येत होत्या. प्रशासनाने जनरेटर उपलब्ध करून वीजेची व्यवस्था केली होती. रात्री साडेअकरा वाजता तोही बंद पडल्याने काम थांबले. रात्री १२ वाजता दुसरा जनरेटर मागवण्यात आला व पुन्हा कामाला सुरूवात झाली. त्यानंतर पहाटेपर्यंत हे काम सुरु होते. दोन पोकलेन, चार जेसीबीच्या सहाय्याने ढिगारा उपसण्यात येत होता. पहाटे ६ वाजल्यानंतर पुन्हा कामाला सुरुवात झाली. आणखी चार जेसीबी बोलावण्यात आले. मात्र ढिगाऱ्याखाली कोणीही आढळून येत नव्हते. तीन तास ढिगारा उपसण्याचे काम सुरु होते. मात्र वारंवार पावसाने व्यत्यय आणला होता. स्थानिकांच्या सांगण्यावरून नेमकी घरे कुठे गाडली गेली असतील, याचा शोध घेऊन राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने त्याचठिकाणी उत्खनन करण्यास सांगितले. रत्नागिरीचे अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांनी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास दिशा ठरवून दिली व त्याठिकाणी माशा घोंगावत असल्याने त्याचठिकाणी उत्खनन करण्याच्या सुचना दिल्या. त्याठिकाणी उत्खनन केल्यानंतर अर्ध्या तासातच आणखी एक मृतदेह आढळला. हा मृतदेह कमलाकर महाडिक यांचा होता. त्यानंतर थोड्याच वेळाने कमलाक्षी महाडिक यांचाही मृतदेह त्याच ठिकाणी आढळून आला. दोन्ही मृतदेह एकाच ठिकाणी झोपलेल्या अवस्थेतच ढिगाऱ्याखाली आढळले. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने त्यांचे मृतदेह मातीतून बाजूला करत स्ट्रेचरच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले व रुग्णवाहिकेतून विच्छेदनासाठी पाठवण्यात आले. एकाच घरातील तिघे मिळाल्यानंतर दुसऱ्या घरातील लोकांचा शोध सुरू झाला. एका ठिकाणचे शोधकार्य थांबल्याने सर्व यंत्रणा एकवटली. मधुकर महाडिक, मधुमालती महाडिक यांचा शोध घेण्यास सुरुवात झाली. त्यांचे घर कोणत्या ठिकाणी गाडले गेले असेल, याबाबत स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करून कामाची दिशा ठरवण्यात आली. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास मधुकर महाडीक याचा मृतदेह आढळून आला. मधुमालती महाडीक यांचा मृतदेह लांबवर फेकला गेल्याने त्यांच्या मृतदेह शोधण्यास तब्बल दोन तासांचा अवधी गेला. त्यानंतर काही काळ मदतकार्य थांबवण्यात आले. त्यानंतर दिनकर महाडीक, कमलाकर महाडीक, कमलाक्षिनी महाडीक यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कमलाकर यांचा एक मुलगा आॅस्ट्रेलियाला असल्याने तो मात्र अंत्यसंस्कारासाठी येऊ शकला नाही. मदतकार्यास आलेल्या लोकांना हॉटेल बंद असल्याने चहापाण्याचीही व्यवस्था नव्हती. बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी सरपंच आनंद गोंधळेकर, स्वप्नील घटे, उदय जावकर, सुहास तोडणकर यांनी चहापानाची व्यवस्था केली. (प्रतिनिधी) दुकाने बंद, वाहनांच्या रांगा दाभोळमध्ये ही भीषण घटना घडल्याचे कळताच अनेकांनी दाभोळ गावाकडे धाव घेतली. खेड, चिपळूण, गुहागर आणि दापोली परिसरातील असंख्य लोकांनी दाभोळकडे धाव घेतली. दाभोळ गावातील एकही दुकान मंगळवारी सुरु नव्हते तर दुसरीकडे वाहनांची लांबच लांब रांग पहायला मिळत होती. हजारो लोकांना टेमकरवाडीतील दृश्य पाहतांना अश्रू अनावर होत होते. मधुकर आणि मधुमालती यांच्या एका मुलाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. त्यांचा दुसरा मुलगा गुरुदास हा मुंबईला असतो. त्याचा येत्या वर्षभरातच विवाह होणार होता. घरात सनईचे सूर वाजणार म्हणून आईवडिलही आनंदात होते. मात्र त्याचा विवाह होण्यापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. दिनकर महाडीक हे गुहागरला स्वामी समर्थांची बैठक करून दाभोळला घरी आले होते. मात्र बैठकीला उशिर झाल्याने तेथील नातेवाईकांनी त्यांना आता जाऊ नका, असा आग्रह केला. तरीही ते निघाले. फेरीबोटची सव्वादहा वाजण्याची शेवटची फेरी असते. मात्र काही नागरिकांनी वाद घालून साडेदहा वाजता पुन्हा फेरीबोट सोडण्यास सांगितले. त्यामुळे दिनकर हे दाभोळ येथील आपल्या भावाच्या घरी आले आणि त्याच पहाटे घरावर दरड कोसळली.
हजारो हातांनी रात्रभर उपसला ढिगारा!
दाभोळ दुर्घटना : सुन्न वातावरणात प्रयत्नांची गजबज... झोपेऐवजी डोळ्यात आशेची जाग...!
By admin | Updated: June 24, 2015 00:41 IST2015-06-24T00:27:12+5:302015-06-24T00:41:58+5:30
दाभोळ दुर्घटना : सुन्न वातावरणात प्रयत्नांची गजबज... झोपेऐवजी डोळ्यात आशेची जाग...!
