Company Owner Diwali Gift: चंदीगडचे समाजसेवक आणि उद्योजक एम.के. भाटिया पुन्हा एकदा चर्चेत आहेत. दिवाळीपूर्वी त्यांच्या 'कार गिफ्टिंग'चे रील्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. भाटिया यांनी या वर्षीही आपल्या सहकाऱ्यांना आणि सेलिब्रिटी मित्रांना आलिशान कार भेट देऊन सर्वांना अवाक् केलंय. सलग तिसऱ्या वर्षी त्यांनी आपल्या टीमला कारचं गिफ्ट दिलं आहे. या गाड्या रँक आणि कार्यक्षमतेनुसार देण्यात आल्यात.
कर्मचाऱ्यांना दिल्या ५१ कार्स
यावेळी भाटिया यांनी एकूण ५१ कार्स वाटल्या. जेव्हा त्यांच्या सहकाऱ्यांनी शोरूममधून नव्या कार्सच्या चाव्या घेतल्या, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे दिसत होता. त्यानंतर सर्वांनी मिळून 'कार गिफ्ट रॅली' काढली, ज्यामुळे संपूर्ण शहराचं लक्ष वेधलं गेलं. सजवलेल्या वाहनांचा ताफा रस्त्यावरून जात असताना लोक मोबाईल काढून व्हिडिओ बनवत होते.
'माझी टीमच माझी ताकद'
दरवर्षी इतक्या महागड्या कार्स कोणी का भेट देतो, असा प्रश्न अनेकांना पडला. यावर एम.के. भाटिया म्हणाले की, 'माझे सहकारीच माझ्या फार्मा कंपन्यांची खरी ताकद आहेत. त्यांची मेहनत आणि प्रामाणिकपणा हेच यशाचे खरे कारण आहे. त्यांना सन्मानित करणं आणि प्रेरित ठेवणं हे माझे कर्तव्य आहे.' हे फक्त गिफ्ट नाही, तर टीमला प्रेरणा देण्याचा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग असल्याचेही ते म्हणाले. भाटिया अनेक वर्षांपासून फार्मा क्षेत्राशी जोडलेले आहेत. २००२ मध्ये ते मेडिकल स्टोअर चालवताना ते दिवाळखोर झाले होते. २०१५ मध्ये त्यांनी स्वतःची फार्मास्युटिकल कंपनी सुरू करून काम सुरू केलं. त्यानंतर त्यांना यश मिळालं आणि आज त्यांच्या १२ कंपन्या कार्यरत आहेत.
सोशल मीडियावर जल्लोष
कार गिफ्ट रील्स सोशल मीडियावर येताच, त्या लगेच व्हायरल झाल्या. अनेक युजर्सनं लिहिलं की, 'असा बॉस प्रत्येकाला मिळावा.' काहींनी भाटिया यांना 'रिअल लाईफ सांता' म्हटलं. त्यांच्या या उपक्रमाने केवळ कर्मचाऱ्यांचेच मन जिंकलं नाही, तर समाजात सकारात्मक नेतृत्वाचा आदर्शही निर्माण केला आहे. थोडक्यात, एम.के. भाटिया यांनी दाखवून दिलं की, यश केवळ कमाईत नाही, तर आनंद आणि कृतज्ञता वाटून घेण्यात आहे.