नवी दिल्ली : सोने आयातीमध्ये पुन्हा वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकार लवकरच यावर आणखी नियंत्रण लावण्याच्या तयारीत आहे. देशाच्या चालू खात्यावरील तूट अर्थात कॅड हाताबाहेर गेल्याने सरकार या उपाययोजना करू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅड कमी करण्यासाठी वित्त मंत्रालय काही बाबींवर काम करत आहे आणि एखाद दोन दिवसांत निर्बंधांसंबंधीच्या घोषणा केल्या जाऊ शकतात.
सोन्याची आयात आॅक्टोबरमध्ये जवळपास चारपट होऊन ४.१७ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली. गेल्यावर्षी आॅक्टोबरमध्ये सोने आयात १.०९ अब्ज डॉलर एवढी होती. प्रमाणाच्या दृष्टीने सोन्याची आयात आॅक्टोबरमध्ये दीडशे टन राहिली. गेल्यावर्षी याच महिन्यात ती २४ टन होती.
निर्यातीच्या तुलनेत आयात वाढून देशाची व्यापार तूट वधारून १३.३ अब्ज डॉलर झाली आहे. आॅक्टोबर २०१३ मध्ये ती १०.९ अब्ज डॉलर होती. गेल्या आठवड्यात सरकारने वाढत्या सोने आयातीवर नियंत्रण आणण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चेकरता बैठक बोलावली होती. चालू खात्याची तूट कमी करण्यासाठी आणि रुपयाचे मूल्य सुधारण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्यावर्षी आॅगस्टमध्ये काही निर्बंध लावले होते. याअंतर्गत सोने आयात शुल्क वाढवून १० टक्के केले होते. आरबीआयच्या या उपाययोजनांमुळे सोन्याच्या आयातीत उल्लेखनीय प्रमाणात घट होण्यास मदत झाली; मात्र यामुळे तस्करीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोन्याच्या आयातीवर आणखी नियंत्रण येणार
सोने आयातीमध्ये पुन्हा वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकार लवकरच यावर आणखी नियंत्रण लावण्याच्या तयारीत आहे.
By admin | Updated: November 19, 2014 00:49 IST2014-11-19T00:49:23+5:302014-11-19T00:49:23+5:30
सोने आयातीमध्ये पुन्हा वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकार लवकरच यावर आणखी नियंत्रण लावण्याच्या तयारीत आहे.
