नवी दिल्ली : सरकारी खर्चाने अत्याधुनिक करण्यात आलेल्या आठ शहरांतील विमानतळांवरून एकही नियमित उड्डाण झाले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या तीन वर्षांत या विमानतळांना सुमारे ८२ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.
अधिकृत सूत्रांनी सांगितले की, आठ अमहानगरी विमानतळांना होणारा एकूण तोटा २०११-१२ मध्ये २५ कोटी रुपये, २०१२-१३ मध्ये २७ कोटी आणि २०१३-१४ मध्ये सुमारे ३० कोटी रुपये राहिला. देशातील दुर्गम भागांना विमान सेवेने जोडण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या योजनेंतर्गत या विमानतळांची उभारणी करण्यात आली होती.
विमानतळांच्या या चिंताजनक स्थितीवर विमान उद्योग तज्ज्ञांनी तीव्र टीका केली आहे. विमानतळांचा विकास वा नव्याची उभारणी करताना बाजाराची सद्य:स्थिती आणि कामकाजाची व्यावहारिकता लक्षात घेण्याची गरज आहे. कोणत्याही राजकीय दबावास बळी पडून यासंदर्भातील निर्णय घेऊ नये, असे सल्ला तज्ज्ञांनी दिला.
महाराष्ट्रातील अकोल्यासह बिकानेर व जैसलमेर (राजस्थान), कुचबिहार (पश्चिम बंगाल), चुडापाह (आसाम), पठाणकोट व लुधियाना (पंजाब) आणि पुद्दुचेरी या आठ विमानतळांना तोटा सहन करावा लागला आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण अर्थात एएआयच्या माध्यमातून सरकारने या विमानतळांचे आधुनिकीकरण केले होते.
तोट्यातील या विमानतळांच्या आधुनिकीकरणासाठी किती रुपये खर्च करण्यात आला, याबाबतची आकडेवारी सद्य:स्थितीत उपलब्ध झाली नाही.
भटिंडा आणि जळगाव विमानतळांच्या आधुनिकीकरणानंतर झालेल्या तोट्याचीही माहिती मिळाली नाही. या दोन विमानतळांवरूनही कोणतेही नियमित उड्डाण झाले नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)
आठ विमानतळांवरून नियमित उड्डाणच नाही!
: सरकारी खर्चाने अत्याधुनिक करण्यात आलेल्या आठ शहरांतील विमानतळांवरून एकही नियमित उड्डाण झाले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
By admin | Updated: December 1, 2014 00:25 IST2014-12-01T00:25:39+5:302014-12-01T00:25:39+5:30
: सरकारी खर्चाने अत्याधुनिक करण्यात आलेल्या आठ शहरांतील विमानतळांवरून एकही नियमित उड्डाण झाले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
