नवी दिल्ली : काही मोबाइल कंपन्यांच्या विलीनीकरणामुळे टेलिकॉम उद्योगातील सुमारे २५ हजार कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या व्होडाफोन कंपनी आयडियामध्ये विलीन होण्याची चर्चा जोरात सुरू असून, एअरसेल ही कंपनी रिलायन्स कम्युनिकेशनमध्ये विलीन होईल, असे दिसत आहे. त्यामुळे अनेकांवर आपल्या नोकऱ्या गमावण्याची वेळ येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
एका मोबाइल कंपनीच्या मनुष्यबळ विकास खात्याच्या प्रमुखाच्या मते, या एकत्रीकरणामुळे हेड आॅफिस आणि सर्कल (आॅफिस) मध्ये काम करणाऱ्या काही कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याची टांगती तलवार आहे. काहींच्या मते सुमारे १२ ते २५ हजार जण यामुळे नोकऱ्या गमावतील, अशी चर्चा असली, तरी एका अर्थविषयक दैनिकाने ही संख्या १ लाखापर्यंत जाऊ शकते, असे वृत्त दिले आहे.
एका अहवालानुसार, आयडिया, व्होडाफोन, आर कॉम आणि एअरसेल या चार कंपन्यांमध्ये मिळून जवळपास ४८ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. एकत्रीकरणामुळे सर्कल प्रमुख, मनुष्यबळ विकास आणि आर्थिक टीम प्रभावित होईल. टेलिकॉम कंपन्यांचा चार ते साडेचार टक्के महसूल कर्मचाऱ्यांवर खर्च होतो. मात्र, त्याचा खरा प्रभाव सेल्स, डिस्ट्रिब्युशनवर पडणार आहे. मोठ्या कंपन्यांचा २२ टक्के खर्च सेल्स आणि डिस्ट्रिब्युशनवर होतो, असे एका कंपनीच्या मनुष्यबळ विकास अधिकाऱ्याने सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
टेलिकॉम उद्योगातील नोकऱ्यांवर गंडांतर?
काही मोबाइल कंपन्यांच्या विलीनीकरणामुळे टेलिकॉम उद्योगातील सुमारे २५ हजार कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता
By admin | Updated: February 16, 2017 00:38 IST2017-02-16T00:38:06+5:302017-02-16T00:38:06+5:30
काही मोबाइल कंपन्यांच्या विलीनीकरणामुळे टेलिकॉम उद्योगातील सुमारे २५ हजार कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता
