नवी दिल्ली : ब्रिटनमधील आपला व्यवसाय डळमळीत झाल्याने आणि आर्थिक उत्पन्न योग्य प्रमाणात होत नसल्याने तेथील पूर्ण व्यवसायाची विक्री करण्याचा निर्णय टाटा स्टीलने घेतला आहे.
जगातील सर्वात मोठ्या पोलाद कंपन्यांपैकी टाटा स्टील ही एक कंपनी आहे. टाटा स्टीलचा ब्रिटनमधील व्यवसाय संकटात सापडला आहे. विशेष म्हणजे ९ वर्षांपूर्वीच टाटा स्टीलने ब्रिटनमधील कोरस या पोलाद कंपनीचे अधिग्रहण करून युरोपातील क्रमांक दोनची कंपनी बनण्याचा मान पटकावला होता. मात्र त्यानंतर गेल्या काही वर्षांत कंपनीची आर्थिक स्थिती बिघडत गेली आणि कंपनीला तेथील व्यवसाय विकण्यास मजबूर व्हावे लागले.
टाटा स्टीलच्या संचालक मंडळाची मंगळवारी रात्री बैठक झाली. त्यात ब्रिटनमधील कंपनी आर्थिक संकटातून बाहेर काढण्याच्या उपायांवर चर्चा झाली. ब्रिटनमध्ये पोलादाची स्वस्त आयात आणि किमतीतील घसरण आणि अन्य काही कारणांमुळे कंपनी संकटात सापडली आहे.
टाटा स्टीलने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ब्रिटनमधील व्यवसायाशी निगडित टाटा स्टीलच्या संचालक मंडळाच्या रणनीतिक चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला.
आपल्या युरोपीय होल्डिंग कंपनीच्या संचालक मंडळाला पोर्टफोलियो पुनर्गठनासाठी सर्व पर्यायांचा विचार करावा आणि टाटा स्टील यू केमधील पूर्ण किंवा आंशिक हिस्सेदारीच्या गुंतवणुकीचाही पर्याय सामील आहे.
ब्रिटनमधील शाखेत निर्माण झालेली पैशाची चणचण ध्यानात घेऊन टाटा स्टील युरोपच्या संचालक मंडळाला सर्वात चांगला पर्याय शोधण्याचा सल्ला देण्यात आला असून त्याची कालबद्ध अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
गेल्या महिन्यातच टाटा स्टील युरोपचे मुख्य कार्यकारी कार्ल कोलर यांनी राजीनामा दिला होता आणि कंपनीने मुख्य तांत्रिक अधिकारी टेन्स फिशर यांना नवीन मुख्य कार्यकारी बनविले होते.
एप्रिल २००७ मध्ये टाटाने ब्रिटनमधील कोरस या कंपनीचे अधिग्रहण करताना कर्ज घेतले होते. मात्र त्यानंतर जागतिक मंदीमुळे कंपनीपुढे वित्तीय अडचणी सुरू झाल्या. त्यातून आजची परिस्थिती उद्भवली असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
कोरसचे अधिग्रहण केल्यानंतर तीच कंपनी पुढे टाटा स्टील युरोप म्हणून ओळखली जाऊ लागली. २००७-०८ च्या वार्षिक अहवालातही टाटा स्टील या कंपनीने सर्व आर्थिक वचनबद्धता पूर्ण केल्याचे म्हटले
होते.
मात्र त्यानंतर मंदीमुळे कंपनीची आर्थिक स्थिती ढासळतच गेली. मंगळवारी रात्री झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत गेल्या १२ महिन्यांत उद्भवलेल्या परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली.
ब्रिटन सरकार-कर्मचाऱ्यांतर्फे पर्यायाचा शोध सुरू
टाटा स्टील युरोपच्या संचालक मंडळाच्या या निर्णयाने ब्रिटनमधील उद्योग क्षेत्रासह सरकार आणि कामगार हादरले आहेत. त्यामुळे हजारो कामगारांचे भवितव्य धोक्यात आले आहे. ब्रिटिश सरकार आणि कामगार यांनी याबाबत नवीन पर्याय शोधणे सुरू केले आहे. सरकारने त्वरित कारवाई करावी, असे कामगारांचे म्हणणे आहे.
जवळपास दशकभरापूर्वी टाटांनी येथील कंपनीचे १४ अब्ज डॉलरमध्ये अधिग्रहण केले होते. या कंपनीत १७ हजार कामगार आहेत. या कंपनीचे राष्ट्रीयीकरण करावे, अशी मागणी कामगारांनी केली असून सर्व कामगारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी शक्य ते सर्व उपाय शोधण्याचे आवाहन केले आहे.
टाटा स्टीलच्या विक्रीच्या निर्णयावर ब्रिटन सरकार आणि कंपनी असलेल्या वेल्स सरकारने एक संयुक्त निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, ब्रिटनच्या मजबूत पोलाद उद्योगात असलेला हा उद्योग ब्रिटनमध्येच राहावा यासाठी आम्ही शक्य ते प्रयत्न करीत आहोत.
‘युनायटेड’ या ब्रिटनमधील सर्वात मोठ्या कामगार संघटनेने म्हटले आहे की, कोरस या मूळ कंपनीचे पुनरुज्जीवन करून तिचे राष्ट्रीयीकरण करण्याच्या मागणीकडे कंझरव्हेटिव्ह सरकार दुर्लक्ष करू शकत नाही.
या कामगार संघटनेचे सरचिटणीस रॉय रिख्खूस यांनी पंतप्रधान आणि कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची त्वरित बैठक बोलावण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, मी आज पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांची भेट घेत आहे. ब्रिटिश सरकार आणि कामगार संघटना दोघेही कामगारांचे हित ध्यानात घेऊन तोडगा काढतील.
संपूर्ण जगात असलेल्या मंदीचा परिणाम टाटा स्टीलवरही झाला. व्यावसायिक पुनर्रचना करून आर्थिक परिस्थिती बदलता येईल काय? यावरही कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. पण ते शक्य नसल्याचे ध्यानात येताच कंपनीने शेवटी तेथील सर्व व्यवसायाची विक्री करण्याचा निर्णय घेतला.
तात्पुरते राष्ट्रीयीकरण शक्य
टाटा स्टीलच्या निर्णयाने हादरलेल्या ब्रिटन सरकारने ‘सर्व पर्यायांवर’ विचार सुरू केला असून कंपनीत सरकारी भागभांडवल ओतून तिचे तात्पुरते राष्ट्रीयीकरण शक्य असल्याचे स्पष्ट केले आहे.
व्यापारमंत्री अॅना साऊबरी म्हणाल्या की, हजारो कामगारांचे रोजगार वाचविण्यासाठी सरकार सर्व पर्यायांचा विचार करीत आहे. ब्रिटनमधील पोलाद उद्योगात टाटांनी प्रचंड रक्कम गुंतवली आहे. त्यांच्याबद्दल आमच्या मनात ‘सद्भावना’ आहे.
टाटा स्टील ब्रिटनमधील व्यवसाय गुंडाळणार
ब्रिटनमधील आपला व्यवसाय डळमळीत झाल्याने आणि आर्थिक उत्पन्न योग्य प्रमाणात होत नसल्याने तेथील पूर्ण व्यवसायाची विक्री करण्याचा निर्णय टाटा स्टीलने घेतला आहे.
By admin | Updated: March 31, 2016 02:30 IST2016-03-31T02:30:53+5:302016-03-31T02:30:53+5:30
ब्रिटनमधील आपला व्यवसाय डळमळीत झाल्याने आणि आर्थिक उत्पन्न योग्य प्रमाणात होत नसल्याने तेथील पूर्ण व्यवसायाची विक्री करण्याचा निर्णय टाटा स्टीलने घेतला आहे.
