प्रसाद गो. जोशी
भारतीय रिझर्व्ह बँकेचे द्वैमासिक पतधोरण या सप्ताहात जाहीर होणार आहे. त्याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून आहे. या जोडीलाच अमेरिकेच्या टॅरिफबाबत होत असलेल्या घडामोडी बाजारावर प्रभाव टाकणाऱ्या आहेत. त्याचबरोबर जाहीर होणारी पीएमआय व औद्योगिक उत्पादनाची जाहीर होणारी माहिती याचाही प्रभाव बाजारावर पडेल.
अमेरिकेने भारतीय औषधांवर टॅरिफ वाढविल्यानंतर त्याचा प्रभाव बाजारावर पडला. परकीय विविध संस्थांनी विक्रीचा धडाका लावल्याने गतसप्ताह बाजारासाठी निराशाजनक राहिला. त्यामुळे तीन सप्ताहांपासून वाढत असलेला बाजार खाली आला.
बाजाराचे सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात बंद
विशेष म्हणजे बाजारातील ही घसरण सर्वच क्षेत्रांमध्ये झालेली दिसून आली. त्यामुळे बाजाराचे सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात बंद झालेले बघावयास मिळाले. या सप्ताहात गुरुवारी बाजाराला सुटी असल्याने व्यवहार होणार नाहीत.
सलग १३व्या आठवड्यात बाजारातून काढले पैसे
> सलग १३ व्या सप्ताहामध्ये परकीय वित्तसंस्थांनी आपली विक्री कायम ठेवली आहे. या सप्ताहात या संस्थांनी १९५७०.०३ कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत.
> गेल्या २४ सप्ताहांपासून खरेदी करीत बाजाराला सावरण्याचा प्रयत्न करीत असलेल्या देशांतर्गत वित्तसंस्थांनी १७४११.४० कोटी रुपयांची खरेदी केली असली तरी त्या बाजाराला सावरू शकल्या नाहीत.
> सप्टेंबर महिन्यामध्ये आतापर्यंत 3 परकीय वित्तसंस्थांची विक्री ६३०१४१.६८ कोटी रुपयांची झाली आहे. रुपयाच्या मूल्यामध्येही या सप्ताहात मोठी घसरण झाली आहे.