प्रसाद गो. जोशी
ग्रामीण रोजगारासाठीच्या विविध योजना, सरकारी बँकांना मिळणारे आर्थिक साह्य आणि भारतीय अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी केलेल्या विविध तरतुदी या अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अर्थसंकल्पातील तरतुदींना बाजाराचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. पहिल्या सप्ताहात सुमारे सहा टक्क्यांची वाढ देऊन बाजाराने अर्थमंत्र्यांना पाठिंबा दर्शविला आहे. याच्या जोडीलाच रुपयाच्या मूल्यामध्ये आलेली मजबुती आणि परकीय वित्तसंस्थांनी सुरू केलेली खरेदी यामुळे बाजारात तेजी येण्याची चिन्हे दृगोचर होऊ लागली आहेत.
गत सोमवारी संसदेत सादर झालेल्या अर्थसंकल्पानंतर बाजाराने निराशाजनक प्रतिक्रिया दिली होती. मात्र, यानंतर उर्वरित सप्ताह बाजार तेजीत राहिला. बाजाराचा संवेदनशील निर्देशांक सप्ताहामध्ये निर्देशांक ६.४४ टक्के म्हणजेच ११४४.९२ अंशांनी वाढून २४६४६.४८ अंशांवर बंद झाला. सुमारे २० महिन्यांनंतर बाजाराने नोंदविलेली ही सर्वाधिक साप्ताहिक वाढ आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ४५५.६० अंशांनी वाढून ७४८५.३५ अंशांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप हे क्षेत्रीय निर्देशांक अनुक्रमे ६.८१ आणि ७.६५ टक्क्यांनी वाढून बंद झाले. अर्थसंकल्पामध्ये सरकारी बँकांना वाढीव भागभांडवल देण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे बाजारात बँकांचे समभाग वाढणार याबाबत शंकाच नव्हती. मात्र, त्याच्या जोडीलाच धातूंच्या समभागांनीही अचानक तेजी दाखविली आहे. जागतिक कमोडिटी मार्केटमध्ये तांब्याच्या किमती वाढल्या. चीनमध्ये लोह खनिजाला मागणी वाढून त्याच्या किमती चार सप्ताहांतील उच्चांकी पोहोचल्या. यामुळे धातूंचे समभाग जोरात राहिले. याशिवाय रिझर्व्ह बँकेकडून नजीकच्या काळात व्याजदरात कपात होण्याचे संकेत मिळाले आहेत. बाजारात सर्वच निर्देशांक तेजीमध्ये होते.
अर्थसंकल्पामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासाचा दर वाढण्याची शक्यता वर्तविली गेली आहे. यामुळेच गेले काही महिने सातत्याने विक्री करीत असलेल्या परकीय वित्तसंस्था तसेच परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गतसप्ताहात जोमाने खरेदी केली. या संस्थांनी ३५४४ कोटी रुपयांचे समभाग विकत घेतले. या जोडीलाच अमेरिकेमधील कृषीतर क्षेत्रामधील रोजगारामध्ये वाढ झाली आहे. यामुळे लवकरच अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपात होण्याची शक्यता आहे.