Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजारात आपटबार

शेअर बाजारात आपटबार

बुधवारी शेअर बाजारांत घसरणीचा आपटबार झाला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल ७२२.७७ अंकांनी, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २२७.८0 अंकांनी घसरला.

By admin | Updated: May 6, 2015 22:41 IST2015-05-06T22:41:03+5:302015-05-06T22:41:03+5:30

बुधवारी शेअर बाजारांत घसरणीचा आपटबार झाला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल ७२२.७७ अंकांनी, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २२७.८0 अंकांनी घसरला.

Stock Market Snapshot | शेअर बाजारात आपटबार

शेअर बाजारात आपटबार

मुंबई : बुधवारी शेअर बाजारांत घसरणीचा आपटबार झाला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल ७२२.७७ अंकांनी, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २२७.८0 अंकांनी घसरला. केंद्रात नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतरच्या काळातील ही दुसऱ्या क्रमांकाची मोठी घसरण ठरली आहे. वस्तू सेवाकर विधेयकाबाबत चिंता वाढल्याने विदेशी गुंतवणूक संस्थांनी मोठ्या प्रमाणात समभाग विक्री केल्यामुळे बाजार घसरल्याचे सूत्रांनी सांगितले.
वस्तू सेवाकराला लोकसभेची मंजुरी मिळाली असली, तरी त्याला विरोधकांकडून प्रचंड विरोधाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे राज्यसभेत त्याच्या मंजुरीचा मार्ग खडतर आहे. त्याचा फटका बाजाराला बसला आहे.
३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स २७,४७३.३६ अंकांवर तेजीसह उघडला होता. नंतर तो आणखी वाढून २७,५0१.१५ अंकांवर गेला. नंतर मात्र तो घसरणीला लागला. ७२२.७७ अंक अथवा २.६३ टक्क्यांची घसरण नोंदवून सेन्सेक्स २६,७१७.३७ अंकांवर बंद झाला. त्या आधी तो २६,६७७.६४ अंकांपर्यंत खाली घसरला होता.
गेल्या ४ महिन्यांतील ही सर्वांत मोठी घसरण ठरली आहे. ६ जानेवारी रोजी सेन्सेक्स ८५५ अंकांनी घसरला होता. २६ मे २0१४ रोजी नरेंद्र मोदी सरकार केंद्रात सत्तेवर आले. त्यानंतरची ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी घसरण आहे.
५0 कंपन्यांच्या समभागांचा व्यापक आधार असलेला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २२७.८0 अंकांनी अथवा २.७४ टक्क्यांनी घसरून ८,0९७ अंकांवर बंद झाला. एनएसईच्या सर्व श्रेणीतील निर्देशांकामध्ये विक्रीचा जोर दिसून आला. (वृत्तसंस्था)

आशियाई बाजारात नरमाईचा कल; युरोपात तेजी

> आशियाई बाजारात नरमाईचा कल दिसून आला. चीन, हाँगकाँग, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि तैवान येथील बाजार 0.0२ टक्के ते १.६२ टक्के घसरले. जपानी बाजार आज बंद होते. युरोपीय बाजारात सकाळी अल्प प्रमाणात तेजी दिसून आली.

> मुंबई शेअर बाजाराची एकूण व्याप्ती नकारात्मक राहिली. २,१४७ कंपन्यांचे समभाग घसरले. ५९0 कंपन्यांचे समभाग वाढले. ११0 कंपन्यांचे समभाग आदल्या दिवशीच्या पातळीवर स्थिर राहिले.

> मुंबई : शेअर बाजारातील मोठ्या घसरणीमुळे बुधवारी गुंतवणूकदारांचे भांडवल २.८९ लाख कोटी रुपयांनी घटून १०० लाख कोटी रुपयांच्या खाली आले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज ७२३ अंकांनी कोसळला.

> मोदी सरकार सत्तेत आल्यापासून निर्देशांकाची एका दिवसातील ही सर्वात मोठी घसरण आहे. यापूर्वी सहा जानेवारी रोजी निर्देशांक ८५५ अंकांनी कोसळला होता.

> आजच्या घसरणीमुळे मुंबई शेअर बाजाराच्या नोंदणीकृत कंपन्यांचे बाजारातील भांडवल २.८९ लाख कोटी रुपयांनी घटून ९९.११ लाख कोटी रुपयांवर आले.

मार्चनंतर सेन्सेक्सने गमावले ३,३00 अंक
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सुधारणांना गती देण्याचा प्रयत्न सुरू केल्यानंतर मार्चमध्ये सेन्सेक्स ३0 हजार अंकांच्या वर गेला होता. त्यानंतर मात्र सेन्सेक्स ३,३00 अंकांनी घसरला आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर जी वाढ झाली होती, त्यापैकी अर्धी वाढ सेन्सेक्सने गमावली आहे. गेल्या तीन आठवड्यांत सेन्सेक्सने २,४00 अंक गमावले आहेत.
आजच्या घसरणीत सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या ३0 पैकी २९ कंपन्यांचे समभाग आपटले. फक्त भारती एअरटेलचे समभाग वाढले आहेत. भेलला सर्वाधिक ६.२१ टक्क्यांची घसरण सोसावी लागली. आयसीआयसीआय बँक, एलअँडटी, एनटीपीसी, सिप्ला, ओएनजीसी, अ‍ॅक्सिस बँक, टाटा पॉवर यांनाही मोठा फटका बसला. 

Web Title: Stock Market Snapshot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.