मुंबई : एक दिवसाच्या तेजीनंतर गुरुवारी शेअर बाजार पुन्हा एकदा कोसळले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 229.09 अंकांनी कोसळून 27,602.01 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्सचा हा सहा आठवडय़ांचा नीचांक ठरला आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती आणखी उतरल्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीज लि. आणि ओएनजीसी यांचे समभाग कोसळले.
50 कंपन्यांच्या समभागांचा समावेश असलेला सीएनएक्स निफ्टी 62.75 अंकांनी अथवा 0.75 टक्क्यांनी कोसळून 8,300 च्या खाली आला. 8292.90 अंकांवर तो बंद झाला. डॉलरच्या तुलनेत रुपयाने 9 महिन्यांचा नीचांक गाठल्याचा परिणामही शेअर बाजारावर झाल्याचे सूत्रंनी सांगितले. आजच्या घसणीनंतर एक डॉलरची किंमत 62.3 रुपये झाली. तेल आणि गॅस, रिअल्टी, आयटी, ऊर्जा आणि बँकिंग या क्षेत्रतील समभाग आज कोसळले. ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती पाच वर्षाच्या नीचांकी पाळीवर जाऊन प्रतिबॅरल 65 डॉलर झाल्या. तेल कंपन्यांमध्ये विक्रीचा जोर दिसला.