मुंबई : मंगळवारी रिझर्व्ह बँकेचा पाचवा द्वैमासिक आढावा जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी शेअर बाजारातील वातावरण काही प्रमाणात सतर्क असल्याचे दिसून आले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १७.४७ अंकांनी वाढला. या उलट राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी मात्र ७.४५ अंकांनी घसरला आहे.
विदेशी गुंतवणूकदारांकडून बाजारात विक्रीचा मारा सुरूच असल्याचे दिसून आले. त्याचवेळी जागतिक बाजारात कमजोर कल पाहायला मिळाला. बाजाराला अमेरिकी रोजगार आकडेवारीची, तसेच या आठवड्यातच होणाऱ्या युरोपीय केंद्रीय बँकेच्या बैठकीची प्रतीक्षा आहे.
३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स गेल्या दोन व्यावसायिक सत्रांत ३५२.४६ अंकांनी वाढला आहे. आज १७.४७ अंकांनी अथवा 0.0७ टक्क्यांनी वाढल्यानंतर तो २६,१४५.६७ अंकांवर बंद झाला. व्यापक आधारावरील एनएसई निफ्टी ७.४५ अंकांनी अथवा 0.0९ टक्क्यांनी घसरून ७,९३५.२५ अंकांवर बंद झाला. ब्ल्यू चिप कंपन्यांत सत्राच्या अखेरीस झालेल्या विक्रीच्या माऱ्याचा फटका निफ्टीला बसला. नोव्हेंबर महिना सेन्सेक्ससाठी प्रचंड नुकसानकारक राहिला. या महिन्यात सेन्सेक्स तब्बल ५११.१६ अंकांनी घसरला. ही घसरण १.९१ टक्के आहे. आॅगस्टनंतरची ही सर्वांत मोठी घसरण आहे. निफ्टी १३0.५५ अंकांनी अथवा १.६१ टक्क्यांनी घसरला. विदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीचा फटका दोन्ही निर्देशांकांना प्रामुख्याने बसला. शुक्रवारी विदेशी गुंतवणूकदारांनी ५१९.२५ कोटी रुपयांचे समभाग विकले.