अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, माननीय अर्थमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्याचा १८ मार्चला होळीच्या पूर्वी आर्थिक संकल्प सादर केला. सर्र्वांचा आवडीचा रंगोत्सव होळी सण आला आहे. कोठे रंग तर कोठे बोंब मारून होळीचा आनंद साजरा केला जातो. जसे बजेटवर विविध स्तरावर चांगल्या तर काही विरुद्ध प्रतिक्रिया आल्या. या अनुषंगे बजेटची होळी की, होळीचे बजेट याची खमंग व ज्ञानवर्धक चर्चा करू या!
कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, होळी म्हणजेच रंगाचा उत्सव. हा सण संपूर्ण भारतात व परदेशातही साजरा केला जातो. तसेच अर्थसंकल्पावर सर्वांचे लक्ष वेधलेले असते व परराज्यीय लोकांचे राज्यात गुंतवणुकीसाठी, व्यवहारासाठी अर्थसंकल्पातील विविध बदलांवर लक्ष असते. होळीमध्ये लोक विविध ओल्या व सुक्या रंगांचा एकमेकांवर वर्षाव करतात आणि आनंद व्यक्त करतात. अर्थमंत्री अर्थसंकल्पात विविध क्षेत्रात योजना आणतात व राज्याच्या प्रगतीसाठी प्रयत्न करतात. होळी या सणामध्ये घरात गोड पदार्थ जसे पूरणपोळी, श्रीखंड इत्यादी केले जाते. तसेच अर्थसंकल्पात दिलेले बदल हे काही करदात्यांच्या बाजूने तर काही विरुद्ध बाजूने असतात. परंतु हे बदल दूरदृष्टीने पाहिले तर हिताचे ठरू शकतात. राज्यात दुष्काळ असल्यामुळे पाण्याविना फक्त रंगाचीच होळी तसेच अर्थसंकल्पात तरतुदीविना खर्च अशी अवस्था अनेकदा होते.
अर्जुन : कृष्णा, होळी व बजेट दरवर्षी येते आणि करदात्याला रंगवून जाते, रंग निघून जातात; पण काही सांगून जातात. हे रंग करदात्याला अर्थसंकल्पातील व्हॅट कराबद्दल काय सांगतात ते सांग. एकमेकांना रंग लावताना ‘गुलाबी रंग’ व ‘हिरवा रंग’ जास्त वापरला जातो. या रंगाना अनुसरून महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्पातील तरतुदी कोणत्या?
कृष्ण : अर्जुना, ‘गुलाबी रंग’ व ‘हिरवा रंग’ हा सूट, आनंद देतो. यांसारख्या कर कमी करणाऱ्या अर्थसंकल्पातील तरतुदी खालीलप्रमाणे आहेत:-
१) एलईडी ट्युब, शैक्षणिक साहित्य जसे पेन, पेन्सिल, वह्णा, गम, फाईल, स्टेप्लर पीन इ. यावरील व्हॅटचा दर १२.५ टक्क्यावरून ५.५ टक्के करण्यात आला आहे.
२) बांबूपासून बनविलेली हस्तकला उत्पादने कर माफ करण्यात आली आहेत.
३) वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन म्हणून वार्पिंग व सायझिंग प्रक्रियेला मूल्यवर्धित करातून माफी दिली आहे.
४) किरकोळ विक्रेत्यांना लागू असलेल्या कंम्पोझिशन योजनेखालील उलाढालीची मर्यादा रु. ५0 लाखांवरून १ कोटी करण्यात आली आहे.
५) ब्रेस्ट कॅन्सरच्या तपासणीसाठी आवश्यक असलेल्या मॅमोग्राफी मशीनवर विक्रीकराची सूट देण्यात आली आहे.
६) इजेक्शनसाठीचे निर्जंतूक पाण्यावर कराचा दर १२.५0 टक्केवरून ५.५ टक्के करण्यात आला आहे.
७) दिव्यांग व्यक्तीसाठीच्या वाहनांकरिता बसविण्याच्या रेट्रोफिट कीटच्या विक्रीवरील कर माफ करण्यात आला आहे.
८) पायरोलिसिस आॅइलच्या विक्रीवरील कर १२.५ टक्केवरून ५.५ टक्के करण्यात आला आहे.
९) स्टिलची बार्बड वायर, वायर मेश आणि चेन लिंक यावरील कराचा दर १२.५ टक्केवरून ५.५ टक्के करण्यात आला आहे.
१0) सरकीचा दर ५ टक्क्यांवरून २ टक्के करण्यात आला आहे.
अर्जुन : कृष्णा, काळा वा वार्नीस रंगाची जोड आपण करचोरीसोबत लावली तर त्यासंबंधी सांग?
कृष्ण : अर्जुना, खूप सुंदर संबंध काळा रंग व करचोरी यासोबत जोडला आहे. माननीय अर्थमंत्र्यांनी नवीन सरकार स्थापन झाल्यापासून कर चोरीवर विशेष भर दिला आहे. याचा अर्थ कर चोरी करणाऱ्याच्या तोंडाला काळा रंग फासला जाईल व त्याची बोंबही फार होईल.
१) वस्तूंच्या विक्रीची किंमत बाजारभावापेक्षा कमी दर्शवून देय विक्रीकर चुकविल्याच्या काही घटना निदर्शनास आल्या आहेत. यास्तव, फेअर मार्केट प्राईसची संकल्पना कायद्यात अंतर्भूत केली जाईल. एखाद्या वस्तूची विक्री करचुकवेगिरीच्या उद्देशाने बाजारभावापेक्षा कमी किमतीत केली असल्यास अशा विक्रीची फेअर मार्केट प्राईसप्रमाणे कर निर्धारणा करण्याचे अधिकार देण्याचे प्रस्तावित आहे.
२) प्रोफेशन टॅक्समध्ये नोंदणी करताना मागील ८ वर्षांचा कर, व्याज व दंड भरावा लागत होता. त्यांच्यासाठी विशेष स्किम प्रस्तावित केली; त्यामुळे फक्त मागील ३ वर्षांचा कर, व्याज व दंड भरावा लागेल. व्यवसाय कर कायद्याखाली नावनोंदणीधारकांसाठी अभय योजना.
३) विक्रीकर विभागाकडून राबविली जाणारी अभय योजना. ३१ मार्च २00५पूर्वीच्या कालावधीसाठी विवादित व थकीत रकमेपैकी कराची पूर्ण रक्कम भरल्यास व्याज व शास्तीची संपूर्ण सूट. दिनांक १ एप्रिल २00५ ते ३१ मार्च २0१२पर्यंतच्या कालावधीतील विवादित व थकीत रकमेपैकी कराची संपूर्ण रक्कम भरल्यास व व्याजाची २५ टक्के रक्कम भरल्यास उर्वरित व्याज व संपूर्ण शास्तीची सूट.
४) संगणकीय देयके (डिजिटल बिलिंग) पद्धतीचा अवलंब करण्यासाठी विक्रीकर विभागाकडून पथदर्शी प्रकल्प राबविणार. विक्रीकर कायद्याअंतर्गत आता प्रत्येक खरेदी-विक्री बिलाची माहिती रिटर्नस्मध्ये द्यावी लागणार आहे. विक्रीकर विभागाने एसएपी आधारित संगणक प्रणालीचा अवलंब येत्या आर्थिक वर्षामध्ये करण्याची संपूर्ण पूर्वतयारी केली. यामुळे करचोरी कमी होईल.
अर्जुन : कृष्णा, लाल रंग अर्थसंकल्पातील कोणत्या तरतुदी दर्शवितो?
कृष्ण : अर्जुना, ‘लाल रंग’, संकट, धोका, भय दर्शवितो. लाल रंग दर्शविणाऱ्या करवाढीच्या अर्थसंकल्पातील तरतुदी खालीलप्रमाणे आहेत:-
१) मूल्यवर्धित कर कायद्याखालील ५ टक्के करदराच्या वस्तूंवरील (घोषित वस्तू वगळून) ५ टक्के कराचा दर वाढवून तो ५.५ टक्के करण्यात आला आहे.
२) हॉटेल, रेस्टॉरंट इ.साठी कंम्पोझिशन स्किमचा दर ५ टक्के होता. आता ३ कोटींपेक्षा जास्त उलाढाल मागील वर्षात असणाऱ्यांसाठी याचा दर ८ टक्के केला आहे.
३) मार्बल व ग्रेनाईटवर आता एन्ट्री टॅक्स आकारण्यात येईल.
४) विक्रीकर कायद्याखालील विवादित प्रश्नांचा जलद निपटारा होण्यासाठी आगाऊ अधिनिर्णय प्राधिकरणाची स्थापना.
५) खोबरेल तेलावरील (५00 मिलीपर्यंत) व्हॅट दर ५ टक्क्यांवरून १२.५ टक्के करण्यात आला आहे.अर्जुन : कृष्णा, या राज्य अर्थसंकल्प व होळीच्या चर्चेतून काय बोध घ्यावा?
कृष्ण : अर्जुना, या अर्थसंकल्पात पिचकारी सुधीर रावांची आणि रंग मोदीजींचा आहे. केंद्र शासनाच्या अर्थसंकल्पातील मुद्दे (रंग) घेऊन या राज्य अर्थसंकल्पात मिसळलेले दिसतात. लोक आपापसांतील राग, द्वेष विसरून पे्रमाने हा सण साजरा करतात. तसेच लोकांनी अर्थसंकल्प सकारात्मक दृष्टीने घेऊन पुढे स्वत:ची, देशाची व राज्याची प्रगती करावी. विविध रंगाची मेळ असलेला हा अर्थसंकल्प आहे. होळीप्रमाणेच विरोधी पक्ष बोंब मारणारच आणि सत्ताधारी रंग उधळणारच. तसेच होळीच्या हास्य कवी संमेलनाप्रमाणे बजेटच्या चर्चासत्रांचीही मजा जनता घेत आहे. असे म्हणतात की, होळीत सांभाळून खेळावे त्याचप्रमाणे कायद्यासोबतसुद्धा सांभाळून खेळावे. अर्थसंकल्पात अनेकांना वाटते की त्यांना वगळण्यात आले; तर कोणाला वाटते की मलाच धरले.. जसे होळीत रंग खेळताना होते. पुढील वर्षी जीएसटीच्या रंगाची बरसात होणार आहे; म्हणून या अर्थसंकल्पात रंगाचा अतिरेक वापर कमी आहे. राज्य दुष्काळग्रस्त असल्यामुळे शेतीला प्राधान्य दिले आहे. या दुष्काळी वर्षात बळीराजा सुखावला तर चालेल आणि करदाता दुखावला तरी चालेल अशी अंमलबजावणी व्हावी असे वाटते. असो. होळी आनंदाने जावो सर्वांचीच.
राज्य सरकारचा अर्थसंकल्प आणि होळी
कृष्णा, माननीय अर्थमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्याचा १८ मार्चला होळीच्या पूर्वी आर्थिक संकल्प सादर केला. सर्र्वांचा आवडीचा रंगोत्सव होळी सण आला आहे
By admin | Updated: March 21, 2016 02:34 IST2016-03-21T02:34:15+5:302016-03-21T02:34:15+5:30
कृष्णा, माननीय अर्थमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्याचा १८ मार्चला होळीच्या पूर्वी आर्थिक संकल्प सादर केला. सर्र्वांचा आवडीचा रंगोत्सव होळी सण आला आहे
