विशाल शिर्के, पुणे
राज्य सहकारी बँकेने रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या (आरबीआय) मार्गदर्शक सूचना धाब्यावर बसवून तोट्यातील साखर कारखान्यांना कर्ज पुरवठा केल्याचे समोर आले आहे. काही कारखान्यांना कर्ज पुरवठा करताना तारण अथवा हमीदेखील घेतली नसल्याने बँकेचे तब्बल ९३२.७१ कोटी रुपयांचे नुकसान झाले.
बँकेच्या संचालक मंडळाने २००७ ते २०११ मध्ये नाबार्डच्या क्रेडिट मॉनिटरिंग अरेंजमेंटच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करून उणे नक्त मूल्य, तोटा असलेल्या व अपुरा दुरावा असलेल्या ९ कारखान्यांना कर्ज पुरवठा केल्याने बँकेचे ३३१ कोटी ९८ लाख ४५ हजार रुपयांचे नुकसान झाले. बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाने २४ कारखान्यांना दिलेल्या कर्जास बँकेने कोणतेही तारण व हमी न घेतल्याने कर्ज असुरक्षित असून, त्यांच्याकडे २२५ कोटी ६६ लाख रुपयांची थकबाकी आहे, तसेच कर्ज वसुलीसाठी मालमत्ता विक्री केलेल्या २२ साखर कारखान्यांकडील १९५ कोटी रुपयांची कर्जे असुरक्षित असल्याचे समोर आले आहे. यामुळे बँकेचे ४२० कोटी ६६ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाने गिरणा सहकारी साखर कारखाना नाशिक, शिंदखेडा सहकारी साखर कारखाना नंदुरबार, नाशिक जिल्हा सूतगिरणी व संत गाडगेबाबा सूतगिरणी दर्यापूर या संस्थांना दिलेल्या कर्जास मालमत्ता तारण गहाण करून न घेतल्याने ६० कोटी ०८ लाख रुपयांची कर्जे असुरक्षित झाली आहेत.
तत्कालीन संचालक मंडळाने केन अॅग्रो एनर्जी (तत्कालीन डोंगराई शेतकरी सहकारी साखर कारखाना) ला दिलेल्या कर्जाची थकबाकी ११९ कोटी ९९ लाख रुपयांवर पोहोचली आहे.
शासनाने या कर्जास दिलेली थकहमी रद्द केली आहे. असे असताना या कर्जाच्या वसुलीसाठी तत्कालीन संचालक मंडळाने योग्य पावले उचलली नसल्याने बँकेचे नुकसान झाले आहे. राज्य सहकारी बँकेवर करण्यात आलेल्या ८३ कारवाईतून ही माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते जयप्रकाश उणेचा यांनी ही बाब समोर आणली आहे.
राज्य सहकारी बँकेचे नऊशे कोटींचे नुकसान
राज्य सहकारी बँकेने रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या (आरबीआय) मार्गदर्शक सूचना धाब्यावर बसवून तोट्यातील साखर कारखान्यांना कर्ज पुरवठा केल्याचे समोर आले आहे
By admin | Updated: October 6, 2014 02:33 IST2014-10-06T02:33:29+5:302014-10-06T02:33:29+5:30
राज्य सहकारी बँकेने रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या (आरबीआय) मार्गदर्शक सूचना धाब्यावर बसवून तोट्यातील साखर कारखान्यांना कर्ज पुरवठा केल्याचे समोर आले आहे
