नवी दिल्ली : मोबाइल फोनवरून पेमेंट करण्याची सोय उपलब्ध करून देणारी युनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) ही यंत्रणा लाइव्ह झाली असून, सध्या २१ बँकांसाठी ही सुविधा उपलब्ध आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन आॅफ इंडियाच्या (एनपीसीआय) वतीने ही माहिती गुरुवारी देण्यात आली.
ही सुविधा व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेस उपलब्ध करून देते. त्यातून पैशांची मागणी करता येते तसेच पैसे अदा करता येतात. सिंगल क्लिकवर देवाण-घेवाण व्यवहार पार पाडता येतात. ही यंत्रणा रिअल टाइम तत्त्वावर काम करते. म्हणजेच मोबाइलवर ज्या क्षणी व्यवहार होताना दिसतो, त्या क्षणी तो प्रत्यक्षात होतोही.
एनपीसीआयचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ए.पी. होटा यांनी सांगितले की, पैशांच्या देवाण-घेवाणीसाठी रिअल टाइम तत्त्वावर काम करणारी तसेच दोन्ही बाजूंनी काम करता येण्याजोगी व्यवस्था एवढ्या मोठ्या प्रमाणावर वापरण्याचा प्रयत्न जगात अन्यत्र कोठेही झालेला नाही. यूपीआय अॅप आता बँकांमार्फत गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. यूपीआय अॅपच्या माध्यमातून ‘लाइव्ह’ झालेल्या बँकांत आंध्र बँक, अॅक्सिस बँक, बँक आॅफ महाराष्ट्र, भारतीय महिला बँक, कॅनरा बँक, ओरिएंटल बँक आॅफ कॉमर्स, युनियन बँक आॅफ इंडिया आणि विजया बँक यांचा समावेश आहे.
यूपीआयच्या सॉफ्टवेअरचे लाँचिंग रिझर्व्ह बँकेचे मावळते गव्हर्नर रघुराम राजन यांनी एप्रिलमध्ये केले होते. त्याच्या पथदर्शक चाचण्या सुरू होत्या. पथदर्शक चाचण्या यशस्वी झाल्यानंतर अॅपच्या सार्वजनिक वापरास रिझर्व्ह बँकेने हिरवा कंदील दाखविला होता. ही यंत्रणा वापरण्याची परवानगी सरसकट सर्व बँकांना देण्यात आलेली नाही. पथदर्शक चाचण्यांत ज्या बँकांनी १ हजार ग्राहकांशी किमान ५ व्यवहार केले असतील, तसेच त्यापैकी ८0 टक्के व्यवहार यशस्वी झाले असतील, अशाच बँकांना ही यंत्रणा वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. या नियमामुळे बँकांनी ही व्यवस्था काटेकोरपणे हाताळली, असे होटा यांनी सांगितले.(लोकमत न्यूज नेटवर्क)
>कोठे वापरता येईल यूपीआय
आॅनलाइन शॉपिंग वेबसाईटवरून मागविलेल्या वस्तूचे पेमेंट करताना रोख रक्कम देण्याऐवजी यूपीआयचा वापर करता येईल.
युटिलिटी बिले देण्यासाठी या अॅपचा वापर करता येईल.
बारकोड आधारित पेमेंटव्यवस्था असलेल्या सर्व ठिकाणी याचा वापर करता येईल. देणग्या, शाळेचे शुल्क भरण्यासाठी यूपीआय वापरता येईल. इतरही असंख्य ठिकाणी याचा वापर करता येईल.
स्मार्टफोन आधारित पेमेंट यंत्रणा लाइव्ह
मोबाइल फोनवरून पेमेंट करण्याची सोय उपलब्ध करून देणारी युनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) ही यंत्रणा लाइव्ह झाली
By admin | Updated: August 26, 2016 06:54 IST2016-08-26T06:54:33+5:302016-08-26T06:54:33+5:30
मोबाइल फोनवरून पेमेंट करण्याची सोय उपलब्ध करून देणारी युनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) ही यंत्रणा लाइव्ह झाली
