कच्च्या तेलाच्या घटणाऱ्या किमती आणि त्यामुळे भारताच्या आयात निर्यात व्यापारातील समतोल राखला जाण्याची शक्यता, आगामी पतधोरणात व्याजदर कमी होण्याची निर्माण झालेली आशा, परकीय वित्तसंस्थांकडून सातत्याने होणारी खरेदी यामुळे बाजाराने मागील सप्ताहात नवीन उच्चांक नोंदवीत वाढीचा सलग सहावा सप्ताह पूर्ण केला.
मुंबई शेअरबाजारात मागील सप्ताहात तेजीचेच वातावरण राहिले. मुंबई शेअरबाजाराचा संवेदनशील निर्देशांक वाढीव पातळीवरच खुला झाला. त्याने २८८२२.३७ अशी नवीन उच्चांकी धडक मारली आणि त्यानंतर तो २८६९३.९९ अंशांवर बंद झाला. बंद निर्देशांकाचाही हा विक्रम आहे. मागील सप्ताहाच्या बंद निर्देशांकापेक्षा ३५९.३६ अंश म्हणजेच १.२७ टक्कयाने निर्देशांक वाढला. सलग सहाव्या सप्ताहात हा निर्देशांक वाढीव पातळीवर बंद झाला, हे विशेष.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी)सुद्धा उच्चांकी पातळीवर बंद झाला आहे. सप्ताहात या निर्देशांकाने ८६१७ अंश अशी नवीन उच्चांकी धडक मारली आहे. सप्ताहाच्या अखेरीस हा निर्देशांक ११०.९० अंशांनी वाढून ८५८८.२५ अंशांवर बंद झाला. मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारांमध्ये गतसप्ताहात उलाढाल वाढीव प्रमाणात झालेली दिसून आली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असतानाच ओपेकने उत्पादन कमी न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमती कमी झाल्या. भारताच्या दृष्टीने ही सुखावह बाब आहे. भारताला जवळपास ८० टक्के कच्चे तेल आयात करावे लागते. त्यामुळे किमती कमी झाल्याने भारताचे परकीय चलन वाचणार आहे. याचा परिणाम आयात-निर्यात व्यापाराचा समतोल साधला जाण्यात होणार असल्याने बाजारात आनंदाचे वातावरण आहे.
गेले काही महिने सातत्याने खरेदी करीत असलेल्या परकीय वित्तसंस्थांनी गतसप्ताहातही जोरदार खरेदी केल्याने बाजारातील तेजीला आणखी बळ मिळाले. परकीय वित्तसंस्थांनी गतसप्ताहात बाजारात ३६४१.८३ कोटी रुपये ओतले आहेत.
या सर्व घडामोडींमुळे भारतातील चलनवाढीचे प्रमाण कमी होण्याची अपेक्षा असून रिझर्व्ह बॅँक आगामी पतधोरणात व्याजदरामध्ये कपात करण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात बळावली आहे. व्याजदरात कपात करण्याची उद्योग जगताची जुनी मागणी असून ती पूर्ण झाल्यास उद्योगांना फायदा मिळणार आहे. परिणामी अर्थव्यवस्थेच्या वृद्धी दरामध्येही वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
नव्या विक्रमासह वाढीचा सहावा सप्ताह
कच्च्या तेलाच्या घटणाऱ्या किमती आणि त्यामुळे भारताच्या आयात निर्यात व्यापारातील समतोल राखला जाण्याची शक्यता
By admin | Updated: December 1, 2014 00:15 IST2014-12-01T00:15:24+5:302014-12-01T00:15:24+5:30
कच्च्या तेलाच्या घटणाऱ्या किमती आणि त्यामुळे भारताच्या आयात निर्यात व्यापारातील समतोल राखला जाण्याची शक्यता
