नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेने व्याजदरात गुरुवारी कपात जाहीर करताच युनायटेड बँकेने आपलाही व्याजदर ०.२५ टक्क्यांनी घटविला. हाच कित्ता स्टेट बँक आॅफ इंडियाही गिरवणार आहे.
घरे, वाहने आणि इतर कर्जांच्या मासिक हप्त्यात काहीशी घट होईल व उत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल. जवळपास दीड वर्षानंतर रिझर्व्ह बँकेने व्याजदरात ०.२५ टक्के घट करून सकाळीच बाजारपेठेला सुखद धक्का दिला. या निर्णयानंतर युनायटेड बँकेने आपल्या १०.२५ टक्के दरात ०.२५ टक्क्यांची घट केली.
रिझर्व्ह बँकेनंतर स्टेट बँक आॅफ इंडियाच्या कर्ज आणि ठेवीच्या व्याजदरांत कपात होणार का, असे विचारता बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य म्हणाल्या, निश्चितच व्याजदरात (कर्ज आणि ठेव) कपात होईल. व्याजदरात कपात व्हावी अशी चर्चा आम्ही आतापर्यंत करीत होतो. व्याजदरातील आताची कपात ही व्याजदर सुसह्य करण्याची सुरुवात आहे. यापुढे व्याजदराच्या चक्राचा आढावा घेतला जाईल, असे भट्टाचार्य म्हणाल्या. आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांनी व्याजदरांत कपात होण्याची ही सुरुवात असून आणखी कपात होईल व व्याजदर कमी होण्यास आणखी संधी असल्याचे सांगितले. दरातील ही कपात केवळ कर्जासाठीच झाली आहे, असे आपण समजायचे कारण नाही. ग्राहक किंमत निर्देशांक जुलै २०१४ पासून सुखावह असून तो अपेक्षेपेक्षाही खाली आल्यामुळे अर्थसंकल्पातील तूट भरून काढण्याची आपली बांधिलकी कायम असल्याचे सरकारने म्हटल्याचे रिझर्व्ह बँकेने सांगितले. रिझर्व्ह बँकेने आपल्या पाचव्या द्वैमासिक आर्थिक धोरण अहवालात (डिसेंबर) म्हटले आहे की, चलनवाढीचा दर जानेवारी २०१५ मध्ये ८ टक्के असेल असे अपेक्षित असतानाही तो खूपच खाली आला व जानेवारी २०१६ मध्ये तो ६ टक्क्यांच्या खाली येईल.
व्यावसायिक बँकांकडून व्याजदर कपातीचा श्रीगणेशा
रिझर्व्ह बँकेने व्याजदरात गुरुवारी कपात जाहीर करताच युनायटेड बँकेने आपलाही व्याजदर ०.२५ टक्क्यांनी घटविला. हाच कित्ता स्टेट बँक आॅफ इंडियाही गिरवणार आहे.
By admin | Updated: January 16, 2015 05:34 IST2015-01-16T05:34:26+5:302015-01-16T05:34:26+5:30
रिझर्व्ह बँकेने व्याजदरात गुरुवारी कपात जाहीर करताच युनायटेड बँकेने आपलाही व्याजदर ०.२५ टक्क्यांनी घटविला. हाच कित्ता स्टेट बँक आॅफ इंडियाही गिरवणार आहे.
