>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - बजेटच्या दिवशी खाली वर झुलणारा शेअर बाजार व्याजदर कपातीच्या आशेने मंगळवारी मात्र उसळला. महागाईच्या वाढीचा दर आटोक्यात आहे, जीडीपीच्या वाढीसाठी चालना हवी आहे, घरांमध्ये लोकांनी गुंतवणूक करावी असे सरकारचे संकेत आहेत, या सगळ्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक व्याजदर कपात करेल अशी आशा गुंतवणूकदारांच्या मनात पल्लवित झाली आणि त्याचे प्रतिबिंब शेअर बाजारात उमटलेले बघायला मिळाले.
मंगळवारी बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स हा निर्देशांक 777 अंकांनी वधारून 23,779 वर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 50 हा निर्देशांक 235 अंकांची वाढ घेत 7,222 वर स्थिरावला. एकाच दिवसातल्या सर्वाधिक वाढीचा हा सात वर्षांतील उच्चांक आहे.
वित्तीय शिस्तीला चिकटून राहण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाचे संकेत बजेटमध्ये मिळाले असून त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक होण्याची गरज व्यक्त होत आहे. आणि त्यासाठी व्याजदर कमी असायला हवेत, जे काम आरबीआय करेल अशी सांगड तज्ज्ञांनी घातली आहे. याचा परिणाम म्हणून गुंतवणूकादारांनी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आणि सेन्सेक्स व निफ्टीच्या घोडदौडीला हातभार लावला.
दरम्यान, भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत सलग तिसऱ्या दिवशी वधारला असून मंगळवारी ही वाढ 40 पैशांची होती. आता एका डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 68.02 झाले आहे. त्याचवेळी जागतिक बाजारातील खनिज तेलाचे भावही एका टक्क्याने वधारले आहेत, जी बाब जागतिक अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आशादायक मानण्यात येत आहे.