चलनवाढीच्या दरामध्ये झालेली वाढ, घटलेले औद्योगिक उत्पादन अशा निराशाजनक पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय राजकीय स्थितीत झालेली सुधारणा, खनिज तेलाच्या किमतीमध्ये झालेली घट, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे वधारलेले मूल्य आणि परकीय वित्त संस्थांनी केलेली खरेदी यामुळे शेअरबाजारात काहीसे तेजीचे वातावरण दिसून आले. याचाच परिणाम म्हणून निर्देशांक २६ हजार अंशांचा टप्पा पार करून गेला. गेले दोन सप्ताह सातत्याने घसरणारा निर्देशांक या सप्ताहात वाढीव पातळीवर बंद झाला.
मुंबई शेअरबाजारात गत सप्ताह संमिश्र राहिला. या काळात निर्देशांक २५,४३७.०५ ते २६,१३५ अंशांदरम्यान फिरत होता. सप्ताहाच्या अखेरीस तो २६,१०३.२३ अंशांवर आला. मागील सप्ताहाच्या बंद निर्देशांकाशी तुलना करता त्यामध्ये ७७४.०९ अंशांची वाढ झाली. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक (निफ्टी) २२३.१५ अंश म्हणजेच २.९५ टक्क्यांनी वाढून ७७९१.७० अंशांवर बंद झाला.
औद्योगिक उत्पादनात सातत्याने होत असलेली घट बाजाराला घोर लावणारी आहे. मागील सप्ताहात जाहीर झालेल्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकाने चिंता वाढविली आहे. जुलैत हा निर्देशांक ५.१९ टक्क्यांवर पोहोचला. गेल्या पाच महिन्यातील हा नीचांक आहे. तसेच घाऊक मूल्य निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दर मात्र वाढत असून, जुलैमध्ये हा दर ७.९६ टक्क्यांवर पोहोचला आहे. जून महिन्यापेक्षा त्यामध्ये सुमारे अर्धा टक्का वाढ झाली आहे.
वाढलेल्या चलनवाढीच्या दरामुळे बॅँकांचे व्याजदर कमी होण्याची शक्यता आता आणखी मंदावू लागली आहे. त्यामुळे आस्थापनांना मिळणारे कर्ज स्वस्त होण्याची शक्यता नाही. त्यातच मंदीचा जोर वाढत असल्याने काय उपाययोजना करावयाची याची चिंता उद्योगांना पडली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या काही आस्थापनांच्या तिमाही आकडेवारीने मात्र बाजाराला काहीशी उभारी आली आहे.
गेले काही सप्ताह सातत्याने तणावपूर्ण असलेली जागतिक परिस्थिती आता सुधारत आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील ताणलेले संबंध आता काहीसे सुधारले आहेत. गाझापट्टीतील लढाईही काही प्रमाणात कमी झाली आहे. याचा परिणाम आंतरराष्ट्रीय शेअरबाजारात व्यवहार वाढण्यात झाला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील खनिज तेलाच्या कमी झालेल्या किमती आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे वाढलेले मूल्य यामुळेही बाजारात व्यवहार वाढले.
संवेदनशील निर्देशांक पुन्हा २६ हजारांवर
चलनवाढीच्या दरामध्ये झालेली वाढ, घटलेले औद्योगिक उत्पादन अशा निराशाजनक पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय राजकीय स्थितीत झालेली सुधारणा
By admin | Updated: August 18, 2014 02:34 IST2014-08-18T02:34:20+5:302014-08-18T02:34:20+5:30
चलनवाढीच्या दरामध्ये झालेली वाढ, घटलेले औद्योगिक उत्पादन अशा निराशाजनक पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय राजकीय स्थितीत झालेली सुधारणा
