मुंबई : सुरुवातीला अल्पशा घसरणीनंतर शेअर बाजारात तेजी परतली आणि मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज १२२.५९ अंकांनी उंचावून २९,६८१.७७ अंकावर बंद झाला. व्यापाराच्या शेवटच्या सत्रात प्रमुख कंपन्यांच्या शेअर्सला मागणी मिळाल्याने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ३८.०५ अंकांच्या बळकटीसह ८,९५२.३५ अंकावर राहिला.
मासिक इक्विटी डेरिव्हेटिव्हज करारांचा निपटारा करण्याचा अवधी समाप्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बाजारात ही तेजी दिसून आली. आठ दिवसांच्या तेजीनंतर सेन्सेक्समध्ये काल घसरण नोंदली गेली होती. दुसरीकडे राष्ट्रीय बाजारात सलग १० व्या सत्रांत तेजी राहिली. बांधकाम क्षेत्र, आरोग्य व दैनंदिन उपयोगाच्या वस्तू तयार करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सला मोठी मागणी होती.
सेन्सेक्स घसरणीसह २९,५१६.४९ अंकावर उघडला व नंतर २९,३७८.३० अंकापर्यंत गेला होता. शेवटी ३० मिनिटांच्या व्यवहारात संस्थात्मक गुंतवणूकदारांची जोरदार मागणी राहिल्याने सेन्सेक्समध्ये तेजी आली व एकावेळी तो २९,७४०.६३ अंकापर्यंत गेला. नंतर तो १२२.५९ अंक वा ०.४१ टक्क्याच्या तेजीसह २९,६८१.७७ अंकाच्या नव्या विक्रमावर बंद झाला. सेन्सेक्स काल ११.८६ अंकांच्या घसरणीसह बंद झाला होता.
५० शेअर्सचा निफ्टीही सुरुवातीला घसरणीने ८,८६१.२५ अंकापर्यंत गेला होता. मात्र, नंतर तो बळकट होऊन ८,९६६.६५ अंकापर्यंत आला. शेवटी निफ्टी ३८.०५ अंक वा ०.४३ टक्क्याने मजबूत होऊन ८,९५२.३५ अंकाच्या नव्या उंचीवर बंद झाला.
सेन्सेक्समधील कोल इंडियाचे शेअर्स आज २.३२ टक्क्यांनी घसरले. सरकारने काल कंपनीत १० टक्क्यांपर्यंत हिस्सेदारी विक्रीचा निर्णय घेतला आहे. यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये घसरण झाली. शेअर विक्रीस आज प्रारंभ होणार आहे.
चीन, तैवान, हाँगकाँग, जपान व दक्षिण कोरियाच्या बाजारात घसरण राहिली, तर सिंगापूर स्ट्रेट टाइम्स स्थिर होता. (प्रतिनिधी)
सेन्सेक्स अन् निफ्टी पुन्हा विक्रमी पातळीवर
सुरुवातीला अल्पशा घसरणीनंतर शेअर बाजारात तेजी परतली आणि मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज १२२.५९ अंकांनी उंचावून
By admin | Updated: January 29, 2015 23:48 IST2015-01-29T23:48:19+5:302015-01-29T23:48:19+5:30
सुरुवातीला अल्पशा घसरणीनंतर शेअर बाजारात तेजी परतली आणि मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज १२२.५९ अंकांनी उंचावून
