>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ - भारतातील स्टेट बँक ऑफ इंडियाला हाँगकाँगने जोरदार दणका दिला असून पैशांची अफरातफर व दहशवातासाठी अर्थ पुरवठा होऊ नये यासाठी असलेल्या कायद्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एसबीआयच्या हाँगकाँगमधील शाखेला तब्बल १० लाख डॉलर्सचा (६ कोटी ४० लाख रुपये) दंड ठोठावला आहे.
हाँगकाँगमध्ये पैशाची अफरातफरविरोधी कायदा २०१२ पासून अंमलात आला असून या कायद्यान्वये हाँगकाँगमधील मध्यवर्ती बँकेने एसबीआय बँकेच्या स्थानिक शाखेविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. एसबीआयने खाते उघडण्यापूर्वी ग्राहकांची सविस्तर माहिती घेतली नव्हती असा ठपका हाँगकाँगच्या मध्यवर्ती बँकेने ठेवला आहे. आम्ही या नियमांच्या उल्लंघनाकडे गांभीर्याने बघते, देशातील सर्वच बँकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे अशी प्रतिक्रिया मध्यवर्ती बँकेच्या अधिका-यांनी दिली आहे.