नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा न केल्यास येत्या १0 वर्षांत या बँकांचा देशाच्या एकूण बँकिंग क्षेत्रातील वाटा घटण्याचा धोका आहे, असा इशारा एका अहवालात देण्यात आला आहे. रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने जारी केलेल्या एका अहवालात म्हटले आहे की, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आपल्या कार्यात मोठी सुधारणा करणे आवश्यक आहे. अन्यथा २0१५ पर्यंत या बँकांची एकूण हिस्सेदारी घटून ६0 टक्के होईल. रिझर्व्ह बँकेने म्हटले की, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये सरकारने निर्गुंतवणूक करणे आवश्यक आहे. बँकांमधील सरकारची भागीदारी कमी करण्याची गरज आहे. त्याशिवाय कामगिरी सुधारणार नाही. सध्याची स्थिती कायम राहिल्यास खाजगी क्षेत्रातील बँकांना लाभ मिळेल. २0२५ पर्यंत खाजगी बँकांची बाजारातील हिस्सेदारी वाढून ३३ टक्के होईल. २000 साली खाजगी बँकांची हिस्सेदारी १२ टक्क्यांपेक्षा थोडी जास्त होती. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची हिस्सेदारी जवळपास ८0 टक्के होती. ती २0२५ पर्यंत ६0 टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ तब्बल २0 टक्के वाटा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना गमवावा लागेल. रिझर्व्ह बँकेने म्हटले की, सरकारी बँकांच्या व्यवस्थापनात मोठे फेरबदल होत नाही, तोपर्यंत सरकार बँकांमधील आपली हिस्सेदारी कमी करण्यास तयार नसते. अशा परिस्थितीत या बँकांसमोरील वाढता एनपीए आणि कमी भांडवलीकरण अशा दुहेरी स्वरूपातील समस्या कायमच राहतील. याचा परिणाम वाढीवर होईल. सरकारने आपली हिस्सेदारी कमी केल्यास या बँकांकडे अतिरिक्त भांडवल उपलब्ध होईल. त्याचा वापर करून बँकांना वाढीला गती देता येईल. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये गुंतवणूक करण्यास विदेशी संस्था नाखुश आहेत. व्यवस्थापनातील बदलाचा अभाव आणि उत्पादकतेतील सुधारणांची दुरावत चाललेली शक्यता याचा हा परिणाम आहे. दुसरीकडे सार्वजनिक क्षेत्रांतील बँकांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या खाजगी बँका आपल्या कामगिरीत सातत्याने सुधारणा करतील. आपल्या व्यावसायिक मॉडेलला सहारा देण्यासाठी या बँका आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवतील. त्या तुलनेत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांत या सुधारणा कमी होतील. याचा थेट परिणाम त्यांच्या वाढीवर होऊन त्या मागे पडतील. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा हिस्सा घटण्याचा धोका
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा न केल्यास येत्या १0 वर्षांत या बँकांचा देशाच्या एकूण बँकिंग क्षेत्रातील वाटा घटण्याचा धोका आहे,
By admin | Updated: May 22, 2014 02:29 IST2014-05-22T02:29:34+5:302014-05-22T02:29:34+5:30
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा न केल्यास येत्या १0 वर्षांत या बँकांचा देशाच्या एकूण बँकिंग क्षेत्रातील वाटा घटण्याचा धोका आहे,
