डॉलरच्या तुलनेत रुपयाचे वाढलेले मूल्य आणि बऱ्याच कालावधीनंतर परकीय वित्तसंस्थांकडून बाजारात सुरू झालेली खरेदी याच्या जोरावर शेअर बाजारातील तेजी कायम राहिली. सुटीमुळे लहान राहिलेल्या सप्ताहात निर्देशांक वाढीव पातळीवर बंद झाला. जीएसटी विधेयकाशिवाय संसदेचे अधिवेशन संपले त्यामुळे आता अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत शांतता राहण्याची शक्यता दिसते.
मुंबई शेअर बाजाराला शुक्रवारी ख्रिसमसची सुटी असल्यामुळे गतसप्ताहात चारच दिवस व्यवहार झाले. दोन दिवस बाजार वर गेला तर दोन दिवस तो खाली आला मात्र बाजार वर जाण्याचा वेग जास्त राहिल्याने गेल्या तीन सप्ताहांमधील बाजाराची चढती कमान कायम राहिली. सप्ताहाच्या अखेरीस संवेदनशील निर्देशांक ३१९ अाांंनी वाढून २५८३८.७१ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) १.३ अंशांनी वाढून ७८६१.०५ अंशांवर बंद झाला आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्येही वाढ झाली.
गेले सुमारे दोन महिने बाजारामध्ये सातत्याने विक्री करीत असलेल्या परकीय वित्तसंस्थांनी गतसप्ताहात खरेदीला प्रारंभ केला आहे. सप्ताहाच्या तीन दिवसांमध्ये या संस्थांनी ९८३.४५ कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली. या खरेदीमुळे बाजारामध्ये काही प्रमाणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून यामुळे आगामी काळात बाजार तेजी दाखविण्याचे संकेत मिळत असल्याचे काही जाणकारांनी सांगितले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जीएसटीचे विधेयक मांडले जाण्याची अपेक्षा फोल ठरली आहे. या विधेयकाविनाच संसदेचे अधिवेशन संपले. आता अर्थसंकल्पिय अधिवेशनात या विधेयकाची अपेक्षा आहे. दरम्यान गतसप्ताहात केंद्र सरकारने लोकसभेत दिवाळखोरीबाबतचे एक विधेयक सादर केले आहे. हे विधेयक अर्थविषयक विधेयक म्हणून सादर झाल्याने ते राज्यसभेत अडण्याची शक्यता नाही. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य वाढत आहे. गतसप्ताहामध्येही रुपयाचे मूल्य ०.३३ टक्क्यांनी वाढला आहे. सप्ताहाच्या अखेरीस एका डॉलरसाठी ६६.२० रुपये असा दर राहिला. आधीच्या सप्ताहात हा दर ६६.४२ असा होता. रुपयाचे मूल्य वाढत असल्याने बाजारामध्ये उत्साह वाढू लागला आहे. परिणामी विविध आस्थापनांचे समभाग खरेदीसाठी गर्दी दिसून आली.
सप्टेंबर, २०१५ अखेर संपलेल्या तिमाहीत भारताच्या चालू खात्यावरील तूट कमी झाली आहे. एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या १.६ टक्के म्हणजेच ८.२ अब्ज डॉलर अशी ही तूट राहिली.
रुपयाची वाढ, परकीय वित्तसंस्थांच्या खरेदीने उत्साह
डॉलरच्या तुलनेत रुपयाचे वाढलेले मूल्य आणि बऱ्याच कालावधीनंतर परकीय वित्तसंस्थांकडून बाजारात सुरू झालेली खरेदी याच्या जोरावर शेअर बाजारातील तेजी कायम राहिली
By admin | Updated: December 28, 2015 00:33 IST2015-12-28T00:33:22+5:302015-12-28T00:33:22+5:30
डॉलरच्या तुलनेत रुपयाचे वाढलेले मूल्य आणि बऱ्याच कालावधीनंतर परकीय वित्तसंस्थांकडून बाजारात सुरू झालेली खरेदी याच्या जोरावर शेअर बाजारातील तेजी कायम राहिली
