नवी दिल्ली : घरात आणि संस्थांना आपल्याकडील सोन्यावर कमाई करण्याची संधी सरकारने निर्माण केली आहे. आपल्याकडील सोने व्यक्ती किंवा संस्था बँकेत ठेव ठेवून त्यावर व्याज मिळवू शकते. मंगळवारी जाहीर झालेल्या या योजनेच्या मसुद्यानुसार किमान ३० ग्रॅम सोने बँकेत ठेव म्हणून ठेवावे लागेल. त्यावर मिळणारे व्याज हे आयकर आणि भांडवली लाभ करापासून मुक्त असेल.
इच्छुक व्यक्ती आणि संस्थेला बीआयएस (ब्युरो आॅफ इंडियन स्टँडर्ड) मान्यताप्राप्त केंद्रांकडून आपल्याकडील सोन्याची किंमत माहिती करून घेता येईल. बँकेत सोने बचत खाते (गोल्ड सेव्हिंग अकाऊंट) किमान एक वर्षासाठी उघडावे लागेल व सोन्यावरील व्याज रोख किंवा सोन्याच्या रूपात घेता येईल. या मसुद्याबद्दल अर्थ मंत्रालयाने संबंधितांना २ जूनपर्यंत आपले म्हणणे सादर करावयास सांगितले आहे. गोल्ड मोनिटायझेशन स्कीम (सुवर्ण मौद्रीकरण योजना) प्रारंभी मोजक्याच शहरांमध्ये लागू करण्याचा प्रस्ताव आहे. ही योजना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१५-२०१६ च्या अर्थसकंल्पात जाहीर केली होती. या योजनेनुसार सोने बँकेत ठेव स्वरूपात ठेवणाऱ्याला त्याच्या सुवर्ण बचत खात्यात व्याज मिळवता येईल व सराफांना त्यांच्या खात्यावर कर्ज घेता येईल, असे जेटली म्हणाले होते.
जगात भारत हा सोन्याचा सर्वांत मोठा ग्राहक असून दरवर्षी तो ८००-१,००० टन सोन्याची आयात करतो. भारतात व्यापारही होत नसलेला किंवा ज्याचा पैसाही करण्यात आलेला नाही असा सोन्याचा साठा २० हजार टनांवर आहे.
व्यक्ती आणि संस्थांकडे पडून असलेल्या सोन्याला व्यवहारात आणून रत्ने आणि दागिन्यांच्या व्यवसायाला चालना देणे आणि देशांतर्गत गरजा भागविण्यासाठी सोन्याच्या आयातीवर अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये, असा या योजनेमागचा उद्देश आहे.
सोने बचत खाते बँकेत उघडल्यानंतर ३०/६० दिवसांनंतर ग्राहकाला व्याज मिळू लागेल. व्याजाचा दर ठरविण्याचा अधिकार बँकांना देण्यात आला आहे. ग्राहकाला द्यावयाची मुद्दल (सोने) आणि त्यावरील व्याजाचे मोल हे सोन्यात असेल, असे हा मसुदा म्हणतो. त्यात उदाहरण देण्यात आले आहे ते असे- ग्राहकाने समजा १०० गॅ्रम सोने बँकेत ठेवले व त्यावर त्याला एक टक्का व्याज मिळणार असेल, तर मुदत संपल्यानंतर त्याच्या खात्यात १०१ गॅ्रम सोने असेल. व्याज सोन्याच्या रूपाने हवे की रोख याची निवड ग्राहक सोने बँकेत ठेव ठेवतानाच करू शकेल.
या योजनेची मुदत किमान एक वर्ष असून नंतर ती एक-एक वर्षाच्या पटीत वाढवता येईल. ही योजना म्हणजे मुदत ठेवीसारखीच आहे. मध्येच या योजनेतून सोने काढून घेता येईल.
च्बँका सोन्याची विक्री करून त्यातून परकीय चलन मिळवू शकतात व या चलनाद्वारे निर्यातदार किंवा आयातदारांना कर्ज देता येईल हादेखील या योजनेचा फायदा आहे. भारतीय सुवर्ण नाणे तयार करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या नाण्यावर अशोक चक्र असेल.
च्बँकांनाही प्रोत्साहन मिळावे असा या योजनेचा उद्देश असून ठेव म्हणून आलेले सोने बँका सीआरआर/ एसएलआरच्या गरजांनुसार रिझर्व्ह बँकेकडे ठेव म्हणून ठेवू शकतात. तथापि, या मुद्याचा अजून अभ्यास केला जात आहे.
च्कॅश रिझर्व्ह रेशो- सीआरआर आणि स्टॅच्युटोरी लिक्विडिटी रेशो-एसएलआर बँकांवर बंधनकारक असून त्यासाठी रिझर्व्ह बँकेचे नियम त्यांना पाळावे लागतात.
सोने बँकेत ठेवा, करमुक्त व्याज मिळवा
घरात आणि संस्थांना आपल्याकडील सोन्यावर कमाई करण्याची संधी सरकारने निर्माण केली आहे. आपल्याकडील सोने व्यक्ती किंवा संस्था बँकेत ठेव ठेवून त्यावर व्याज मिळवू शकते.
By admin | Updated: May 20, 2015 01:42 IST2015-05-20T01:42:19+5:302015-05-20T01:42:19+5:30
घरात आणि संस्थांना आपल्याकडील सोन्यावर कमाई करण्याची संधी सरकारने निर्माण केली आहे. आपल्याकडील सोने व्यक्ती किंवा संस्था बँकेत ठेव ठेवून त्यावर व्याज मिळवू शकते.
