>ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. १८ - इराणवरील निर्बंध उठल्यामुळे खनिज तेलाचा पुरवठा वाढणार असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव प्रति पिंप २८ डॉलरखाली घसरले आहेत. गेल्या २१ वर्षांतली नीचांकी पातळी गाठताना आज प्रति पिंप २७.६७ डॉलर इतका खनीज तेलाचा भाव घसरला होता.
इराणवरचे निर्बंध उठवल्यामुळे दररोज सुमारे पाच लाख पिंपे इतका पुरवठा वाढण्याची शक्यता आहे.
रविवारी इराणवरचे निर्बंध उठवण्यात आले. खनिज तेलांच्या साठ्यांच्या बाबतीत इराण हा जगात चौथ्या क्रमांकावरील देश आहे. आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे इराणच्या खनिज तेलाचे उत्पादन व विक्री गोठली होती. आता, ती कसर भरून काढण्यासाठी व जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी इराणने कंबर कसली तर रोजच्या रोज आंतरराष्ट्रीय बाजारात १० लाख पिंपांचा अतिरिक्त भडमार होऊ शकतो आणि तेलाचे भाव आणखी कोसळू शकतात. २०१४च्या मध्यापासून तेलाचे भाव घसरायला सुरूवात झाली, आणि तेव्हापासून आत्तापर्यंत झालेली घसरण ७० टक्के इतकी आहे.
खनिज तेलाचे उत्पादन करणा-या देशांनी भाव पडले तरी चालतिल परंतु उत्पादन घटवणार नाही अशी भूमिका घेतल्यामुळे पुढील दोन वर्षे तरी तेलाचे भाव पडलेले राहतिल अशी शक्यता आहे.