मुंबई : राज्यात आता पेट्रोल आणि डिझेलवरील स्टेट स्पेसिफिक सरचार्ज काढून टाकण्याचा निर्णय घेतल्याने, पेट्रोल दीड रुपयाने तर डिझेल १ रुपया २० पैशांनी स्वस्त झाले आहे.
मुंबईत तेल कंपन्यांच्या दोन रिफायनरी असून, या रिफायनरीमध्ये जे कच्चे तेल आयात होते, त्यावर मुंबई महापालिका ३ टक्के दराने जकात आकारते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत २०१२मध्ये कच्च्या तेलाच्या किमती १५० डॉलर प्रति बॅलर झाल्याने, कच्च्या तेलावर ३ टक्के दराने मुंबई महापालिकेला द्याव्या लागणाऱ्या रकमेत तीनपट वाढ झाली. ही जकातीची रक्कम वार्षिक २५०० कोटींपर्यंत पोहोचली. जकातीच्या रकमेत मोठी वाढ झाल्याने व तेल कंपन्यांना पेट्रोल व डिझेलच्या किमती ठरवण्याच्या अधिकार नसल्याने, तेल कंपन्यांना जकातीच्या वसुलीपोटी डिझेलवर २.४२ पैसे व पेट्रोलवर ३.४३ पैसे दराने महाराष्ट्रातून वसुली करण्यास केंद्र सरकारने तेव्हा परवानगी दिली, परंतु २०१४-१५पासून कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड घट होऊन, सदर कच्च्या तेलावर ३ टक्के दराने द्याव्या लागणाऱ्या जकातीच्या रकमेत ५0 टक्के घट झाली. मात्र, तेल कंपन्यांनी स्टेट स्पेसिफिक सरचार्जमध्ये घट न करता वसुली कायम ठेवली. त्यामुळे तेल कंपन्यांकडे अतिरिक्त वसुली झाल्याबाबतची तक्रार फेडरेशन आॅफ आॅल महाराष्ट्र पेट्रोल डीलर असोसिएशनने केली होती.
तेल कंपन्यांचा प्रस्ताव
तेल कंपन्यांनी सदर अतिरिक्त वसुलीपैकी स्टेट स्पेसिफिक सरचार्ज कमी करण्याचा प्रस्ताव केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाकडे पाठविला होता. केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांची भेट घेऊन हा सरचार्ज कमी करण्याबाबत बैठक झाली होती. त्यातूनच पेट्रोल १.५० पैसे व डिझेल १.२० पैसे इतके स्वस्त झाले आहे.
पेट्रोल-डिझेल स्वस्त
राज्यात आता पेट्रोल आणि डिझेलवरील स्टेट स्पेसिफिक सरचार्ज काढून टाकण्याचा निर्णय घेतल्याने, पेट्रोल दीड रुपयाने तर डिझेल १ रुपया २० पैशांनी स्वस्त झाले आहे.
By admin | Updated: April 10, 2016 03:55 IST2016-04-10T03:55:13+5:302016-04-10T03:55:13+5:30