विजयकुमार सैतवाल - जळगाव
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या घसरणाऱ्या किमतीमुळे इथेनॉलची निर्मिती कमी होऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर साखरेचे उत्पादन वाढत आहे. यामुळे साखरेचे भाव तर कमी होत आहे; मात्र यामुळे साखर उद्योगाच्या संकटांमध्ये भर पडत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात दिवसेंदिवस कच्च्या तेलाच्या किमती कमी होत आहेत. याचा परिणाम साखर उद्योगावर जाणवू लागला आहे. जगात ब्राझील हा सर्वात मोठा साखर उत्पादक देश असून येथून भारतासह अनेक देशांमध्ये दाणेदार साखरेसह कच्ची साखर निर्यात केली जाते. तेथे पूर्वी साखरेइतकेच इंधन म्हणून इथेनॉलचीसुद्धा निर्मिती केली जात होती. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होऊन त्या प्रति बॅरल ५० डॉलरपेक्षा कमी झाल्या आहेत. परिणामी ब्राझीलने इथेनॉलचे उत्पादन कमी करून ते केवळ २० टक्क्यांवर आणले आहे, तर साखरेचे उत्पादन ८० टक्क्यांवर पोहचले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात साखर मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊन तिचे दर गडगडले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर २१ ते २२ रुपये प्रति किलो असून त्यात भारतातही यंदा साखरेचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्याने दर घसरणीला मदत तर होत आहे; मात्र साखर उद्योगांच्या संकटात भर पडत आहे.
साखरेला भाव मिळत नसल्याने ऊस उत्पादकांना द्यावा लागणारा भाव, बँकेचे व्याज, एफआयआरमधील तफावत या सर्व बाबींमुळे साखर उत्पादकांची चिंता वाढत आहे.
‘एफआयआर’मधील तफावत
केंद्र सरकारच्या कायद्यानुसार साखर कारखानदारांकडून ऊस उत्पादकांना एफआयआर (किफायतशीर रास्त दर) द्यावा लागतो. हा दर मागील वर्षीच्या उताऱ्यावर अवलंबून असतो व तो त्या-त्या विभागातील उत्पादनानुसार वेगवेगळा असतो. त्यानुसार खान्देशात हा दर १८०० रुपयांच्या पुढेच, तर पश्चिम महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन जास्त असल्याने तेथे तो २२०० ते २४०० रुपयांच्या जवळपास असतो. मात्र कारखान्यांचीही एवढा दर देण्याची क्षमता नसल्याने बाजार मूल्यानुसार (मार्केट रेट) बँकेकडून कारखान्यांना ही उचल मिळते. खान्देशात हा दर १८०० रुपयांच्या पुढे असला तरी बँकेकडून एवढा दर न मिळता केवळ १३०० रुपये मिळत असल्याने ५०० ते ५५० रुपयांची तफावत (शॉर्ट) यामध्ये आहे. त्यात सध्या साखरेला भाव नसल्याने बँकही जास्त दर देऊ शकत नसल्याने अडचणीत भर पडत आहे.
बँकेकडून पूर्ण रक्कम मिळण्यास येणाऱ्या तांत्रिक अडचणी, उत्पादित साखरेला न मिळणारा भाव व त्यात ऊस उत्पादकांना द्यावे लागणारे ठरवून दिलेले दर, अशा एक ना अनेक समस्या साखरेच्या वाढलेल्या उत्पादनामुळे साखर उद्योगांसमोरच उभ्या ठाकल्या आहेत.
४आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होण्यासह साखरेचे उत्पादन वाढून तिचेही भाव कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचा मोठा साठा उपलब्ध होऊन साखरेला भाव मिळत नसल्याने साखर उद्योगाला त्याचा फटका बसून त्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने ब्राझील या सर्वात मोठ्या साखर उत्पादक देशाने इथेनॉलचे उत्पादन घटवून साखरेचे उत्पादन वाढविले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात साखर मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्याने तिचे दर घसरले आहे. याचा फटका साखर उद्योगांना बसत असून त्यांच्या अडचणींमध्ये भर पडत आहे, असे फैजपूर येथील मधुकर साखर कारखान्याचे संचालक डॉ.आर.एम. चौधरी यांनी सांगितले.
तेलाच्या किमती घसरल्याचा साखर उद्योगाला फटका
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या घसरणाऱ्या किमतीमुळे इथेनॉलची निर्मिती कमी होऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर साखरेचे उत्पादन वाढत आहे.
By admin | Updated: March 3, 2015 00:36 IST2015-03-03T00:36:12+5:302015-03-03T00:36:12+5:30
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या घसरणाऱ्या किमतीमुळे इथेनॉलची निर्मिती कमी होऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर साखरेचे उत्पादन वाढत आहे.
