मुंबई : कराच्या कक्षेत येणारे उत्पन्न असूनही कराचा भरणा न करणाऱ्या करदात्यांच्या शोधासाठी प्राप्तिकर विभागाने सुरू केलेल्या धडक मोहिमेला मोठे यश प्राप्त झाले असून चालू आर्थिक वर्षात तब्बल ४० लाख नव्या करदात्यांना जोडण्यात विभागाला यश आले आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष अतुलेश जिंदल यांनी या माहितीला दुजोरा दिला असून महिन्याकाठी नव्हे, तर आता दिवसाकाठी काही नवे करदाते जोडले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे विकसित करण्यात आलेली ‘नॉन फायलर्स मॅनेजमेंट सिस्टिम’ आणि एका आर्थिक वर्षात एक कोटी नवे करदाते शोधण्यासाठी सुरू असलेली विशेष मोहीम यामुळे करदात्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
सध्या पॅनकार्ड हे सर्वत्र जोडलेले आहे. त्यातही बँक खाते उघडताना पॅनकार्ड बंधनकारक करण्यात आल्यामुळे बँकेत जमा होणारे उत्पन्न, त्याचे खर्च या अनुषंगाने सर्व माहिती कर विभागाला उपलब्ध होत आहे. त्याचा आधार घेत संबंधिताला तो कराच्या कक्षेत येत असल्याचे सूचित करीत नोंदणी करून घेण्यात आली आहे. यामुळे केवळ करदातेच नव्हे, तर कर संकलनही वाढीस लागले आहे. यापुढेही या दोन माध्यमांद्वारे नवीन करदाते शोधण्याची मोहीम सुरू राहणार आहे; पण या दोन मार्गांना आता ‘ई-सहयोग’ या नव्या मोहिमेचा हातभार लागणार आहे. १२५ कोटी लोकसंख्येपैकी २०१३ पर्यंत जेमतेम सव्वाचार कोटी लोकच प्राप्तिकर विभागाकडे नोंदणीकृत होते आणि यापैकी ६० टक्के लोक प्रत्यक्ष करदाते होते. त्या दरम्यान सातत्याने घटणारे कर संकलन आणि उत्पन्न वाढूनही कर न भरण्याच्या वाढीस लागलेला प्रकार या अनुषंगाने तत्कालीन केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी सर्व प्राप्तिकर उच्चाधिकाऱ्यांची बैठक घेत, कर आणि करदाते वाढविण्यासाठी नवी यंत्रणा विकसित केली होती.