नवी दिल्ली : देशात प्रथमच एका तुरुंगातील कैदी कार निर्मात्या कंपनीला सुट्या भागांचा पुरवठा करणार आहेत. तिहार तुरुंगातील एका छोट्या कारखान्यात एकीकडे वाहन कंपन्यांसाठी सुटे भाग तयार केले जातील, तर तिथेच कैद्यांसाठी प्रशिक्षण व रोजगार संधीही उपलब्ध होतील.
दिल्ली तुरुंगाचे महासंचालक आलोक वर्मा यांनी वाहन कार्यशाळेचे उद्घाटन केले. दिल्ली तुरुंगाचे उपमहानिरीक्षक व जनसंपर्क अधिकारी मुकेश प्रसाद यांनी याबाबत माहिती दिली.
ते म्हणाले, कार्यशाळेत काम केल्याने कैद्यांना अल्प तसेच दीर्घ काळासाठी लाभ होईल. एकीकडे मजुरी मिळत असतानाच त्यांना रोजगाराभिमुख कौशल्यही मिळेल. याद्वारे तुरुंगवासाची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्यांचे पुनर्वसन होण्यास मोठी मदत होईल. अशोक मिंडा समूहाच्या स्पार्क मिंडा व जपानच्या फुरुकावा यांच्या संयुक्त विद्यमाने मिंडा फुरुकावा इलेक्ट्रिक प्रायव्हेट लिमिटेडने ही कार्यशाळा सुरू केली आहे.
रोजंदारीपेक्षा अधिक मोबदला
तिहारच्या कार्यशाळेतील कैदी तांत्रिक व्यावसायिकांच्या निगराणीखाली काम करणार आहेत. तुरुंगातील अन्य कैद्यांना रोजंदारीपेक्षा या कामाचा अधिक मोबदला मिळेल.
३० ते ३५ कैदी सहभागी
या उल्लेखनीय उपक्रमात एकावेळी ३० ते ३५ कैदी सहभागी होतील. भविष्यात यांच्या संख्येत वाढ केली जाईल. स्पार्क मिंडा समूहाचे मुख्य विपणन अधिकारी एन. के. नतेजा यांनी सांगितले की, या उपक्रमाने निश्चितपणे टिकाऊ सहयोगात्मक सामाजिक व्यावसायिक भागीदारीचे एक प्रारूप तयार होईल. याचा तिहारमधील कैदी व त्यांच्या कुटुंबियांना मोठा लाभ होईल. आमचा अन्यत्रही अशाच प्रकारचे उपक्रम राबवण्याचा विचार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
आता ‘तिहार’मधील कैदी बनवणार वाहन उपकरणे
देशात प्रथमच एका तुरुंगातील कैदी कार निर्मात्या कंपनीला सुट्या भागांचा पुरवठा करणार आहेत.
By admin | Updated: September 10, 2014 06:14 IST2014-09-10T06:14:03+5:302014-09-10T06:14:03+5:30
देशात प्रथमच एका तुरुंगातील कैदी कार निर्मात्या कंपनीला सुट्या भागांचा पुरवठा करणार आहेत.
