>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - मॉल, चित्रपट गृह, विमानतळ, स्टेडियम या ठिकाणी वेगवेगळ्या वस्तूंची किंमत वेगवेगळी असल्याचे किंवा काही वस्तू छापील किमतीपेक्षा अधिक किमतीला मिळत असल्याचे तुमच्या पाहण्यात आले असेलच. मात्र आता कंपन्या एकच वस्तू वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या किमतीला विकू शकणार नाहीत. सरकारने केलेल्या नव्या नियमानुसार 1 जानेवारी 2018 पासून कुठल्याही वस्तूची वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी किंमत वसूल करता येणार नाही. लीगल मेट्रॉलॉजी (पॅक्ड कमोडिटीज) नियम, 2011 पुढील वर्षाच्या सुरुवातीला लागू होणार आहे.
लीगल मेट्रॉलॉजीशी संबंधित असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही उत्पादकांना काही वेळ देत आहोत. ज्यामुळे ते नव्या नियमांचे पालन करण्याची तयारी करू शकतील. ग्राहकांसंबंधीच्या विभागाने सांगितले की, व्यापक विचार विनियमयानंतर हे पाऊल उचलले आहे. नियमांना लागू करण्याचा अनुभव आणि विविध घटकांशी केलेल्या व्यापक चर्चेच्या आधारावर नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. ज्यामुळे ग्राहकांच्या हितांचे संरक्षण होऊ शकेल.
या नियमांनुसार कुठलीही व्यक्ती आधीपासूनच वेष्टनांकित असलेल्या वस्तूवर छापण्यात आलेल्या अधिकतम बाजार मूल्यापेक्षा जास्त किंमत सांगू शकणार नाही. या नियमामुळे ग्रहकांना मोठा फायदा होणार आहे. कारण चित्रपटगृह, विमानतळ, मॉल या ठिकाणी एमआरपीपेक्षा अधिक रक्कम वसूल करण्यात आल्याची तक्रार ग्राहकांकडून करण्यात येत असते.