Lokmat Money > बिझनेस न्यूज > लाखोंना प्राप्तिकरच्या नोटिसा

लाखोंना प्राप्तिकरच्या नोटिसा

यंदा प्राप्तिकर विवरण भरण्यास फारशी मुदतवाढ न दिल्यानंतर आता प्राप्तिकर विभागाने त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार ज्यांना करदायित्व आहे

By admin | Updated: September 13, 2014 03:04 IST2014-09-13T03:04:50+5:302014-09-13T03:04:50+5:30

यंदा प्राप्तिकर विवरण भरण्यास फारशी मुदतवाढ न दिल्यानंतर आता प्राप्तिकर विभागाने त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार ज्यांना करदायित्व आहे

Notices of Income Tax to millions | लाखोंना प्राप्तिकरच्या नोटिसा

लाखोंना प्राप्तिकरच्या नोटिसा

मनोज गडनीस, मुंबई
यंदा प्राप्तिकर विवरण भरण्यास फारशी मुदतवाढ न दिल्यानंतर आता प्राप्तिकर विभागाने त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार ज्यांना करदायित्व आहे, तसेच करदायित्व नाही तरीही विवरण भरण्याच्या श्रेणीत ज्यांचा समावेश होतो, अशा तब्बल २२ लाख लोकांना ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठविण्याचे काम सुरू केल्याचे वृत्त आहे.
उच्चपदस्थ सूत्रांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, २२ लाख लोकांना नोटिसा हा या प्रक्रियेचा पहिला टप्पा असून आगामी तीन महिन्यांत त्या पाठविण्यात येतील, तर समांतर पातळीवर आतापर्यंत दाखल झालेल्या विवरणाच्या छाननीचे कामही तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येणार असून, त्यानंतर पुढे येणाऱ्या माहितीनुसार डिसेंबरपर्यंत पुढील लोकांना नोटिसा पाठविण्यात येतील. गेल्या वर्षी एकूण ६७ लाख लोकांना नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. गेल्या वर्षी पहिल्या टप्प्यांत १२ लाख लोकांना नोटिसा पाठविल्या होत्या.
यंदा पहिल्याच टप्प्यांत हा आकडा २२ लाखांवर पोहोचला असल्याने वर्षअखेर हा आकडा गेल्या वर्षीपेक्षा किमान १० ते १२ लाखांनी जास्त असेल, असा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला. ज्यांना नोटिसा धाडण्यात येतील, त्यापैकी ज्यांना करदायित्व नसेल अशा लोकांना पाच हजार रुपयांचा दंड भरून विवरण भरता येईल, तर ज्यांना करदायित्व आहे
अशा लोकांना पाच हजार रुपयांच्या दंडासोबतच करपात्र रकमेवरही
दंडाची आकारणी केली जाणार आहे.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने अलीकडेच सर्व प्राप्तिकर आयुक्तांची बैठक घेऊन करसंकलन वाढीसाठी आक्रमक होण्याचे आदेश दिले आहेत. नोेटिसा हा त्याचाच एक भाग आहे. केवळ नोटिसा देऊन विभाग थांबणार नाही, तर ज्यांचे करदायित्व आहे व ज्यांनी विवरणाचा भरणा केलेला नाही, अशा लोकांचे सर्व व्यवहार तपासून त्यांच्यावर रीतसर केसही दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. उपलब्ध माहितीनुसार वित्तीय गुप्तचर यंत्रणेकडून गेल्या आर्थिक वर्षात रोखीने झालेल्या मोठ्या व्यवहारांचा तपशील त्यांनी प्राप्तिकरला दिला असून, अशांकडे पहिल्यांदा प्राप्तिकर विभाग लक्ष केंद्रित करेल. ज्यांनी एक लाख रुपये अथवा त्यापेक्षा अधिक रकमेचे व्यवहार रोखीने केलेले आहेत, त्यांच्यापासून कारवाईची सुरुवात करण्यात येणार आहे. एकीकडे वैयक्तिक करदात्यांकडे मोर्चा वळवितानाच समांतर पातळीवर कॉर्पोरेट कंपन्यांकडेही विभागाने आता बारकाईने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. ज्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून कर कापला आहे (टॅक्स डिडक्टेड अ‍ॅट सोर्स); मात्र ज्यांनी अद्यापही त्या रकमेचा भरणा विभागाकडे केलेला नाही, त्यांनाही नोटिसा धाडण्यात येणार आहेत.

Web Title: Notices of Income Tax to millions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.