भाजपाने विधानसभा निवडणुकांमध्ये मिळविलेला दणदणीत विजय, जीएसटी लागू होण्याची वाढलेली शक्यता, परकीय, तसेच देशी वित्तसंस्थांनी बाजारामध्ये ओतलेला पैसा, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे वाढलेले मूल्य आणि अमेरिकेने केलेली व्याजदरातील वाढ अशा अनेक घटनांमुळे शेअर बाजार तेजीत राहिला. निफ्टी निर्देशांकाने नोंदविलेला आतापर्यंतचा उच्चांक हे या सप्ताहाचे वैशिष्ट्य आहे.
बाजारात गतसप्ताह हा तेजीचाच राहिला. निफ्टी निर्देशांकाने ९२०० अंशांची पातळी ओलांडून आतापर्यंतच्या उच्चांकाची नोंद केली. मात्र त्यानंतर, नफा कमविण्यामुळे हा निर्देशांक खाली आला. सप्ताहाच्या अखेरीस तो मागील बंद निर्देशांकापेक्षा २२५ अंशांनी वाढून ९१६०.०५ अंशांवर बंद झाला. संवेदनशील निर्देशांकही ७०२ अंश (२.४ टक्के) वाढून २९६४८.९९ अंशांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे चार आणि तीन टक्के वाढून बंद झाले.
राज्य विधानसभांच्या निवडणुकांमध्ये भाजपाला मिळालेल्या दणदणीत विजयाचे बाजारात जोरदार स्वागत होणार हे अपेक्षितच होते. त्यापाठोपाठ जीएसटी परिषदेने जीएसटीबाबतची पाच विधेयकेही संमत केली. यामुळे येत्या १ जुलैपासून जीएसटी लागू होण्याची शक्यता बळावली आहे. भाजपाच्या विजयाने आर्थिक सुधारणांना गती मिळण्याच्या शक्यतेने परकीय वित्तसंस्थाही सक्रीय झाल्या आहेत. त्यांनी, तसेच देशी वित्तसंस्थांनी बाजारामध्ये मोठी गुंतवणूक केलेली दिसून आली.
गतसप्ताहामध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य वाढले असून, गेला १६ महिन्यांमधील उच्चांक गाठला आहे. देशामध्ये होत असलेल्या परकीय गुंतवणुकीचा हा परिणाम आहे. अमेरिकेने व्याजदरांमध्ये पाव टक्का वाढ करण्याची घोषणा केली आहे. अर्थव्यवस्थेची सुधारत असलेली स्थिती, वाढलेला रोजगार आणि चलनवाढीचा दर अपेक्षित वाढ दाखविण्याच्या शक्यतेने ही वाढ झाली आहे.
खासगी समभाग गुंतवणुकीत ५० टक्के घट-
फेब्रुवारी महिन्यात भारतामध्ये झालेल्या खासगी समभाग गुंतवणुकीमध्ये सुमारे ५० टक्के घट झाली आहे. गेल्या ३२ महिन्यांमधील नीचांक यामुळे नोंदविला गेला आहे. मोठे व्यवहार झालेले नसल्याने ही घट झाली.
फेब्रुवारी महिन्यात खासगी समभाग गुंतवणुकीचे एकूण ४४ व्यवहार झाले. त्यामधून ५८५ दशलक्ष अमेरिकन डॉलरची गुंतवणूक झाली. मागील वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये ९७ व्यवहारांमधून १.२८ अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक भारतामध्ये झाली होती. जानेवारी महिन्यामध्ये केवळ एकाच व्यवहारात
१०० दशलक्ष अमेरिकन डॉलरची गुंतवणूक झाली होती.
थेट परकीय गुंतवणुकीमध्ये स्टार्ट अप/ई-कॉमर्स हे क्षेत्र सर्वात पुढे आहे. यामध्ये सुमारे ८० टक्के गुंतवणूक होत आहे. चालू वर्षामध्ये आतापर्यंत झालेल्या गुंतवणुकीपैकी या क्षेत्राने ६८ टक्के गुंतवणूक खेचली आहे.
निफ्टीने नोंदविला आतापर्यंतचा उच्चांक
भाजपाने विधानसभा निवडणुकांमध्ये मिळविलेला दणदणीत विजय, जीएसटी लागू होण्याची वाढलेली शक्यता
By admin | Updated: March 20, 2017 01:16 IST2017-03-20T01:16:38+5:302017-03-20T01:16:38+5:30
भाजपाने विधानसभा निवडणुकांमध्ये मिळविलेला दणदणीत विजय, जीएसटी लागू होण्याची वाढलेली शक्यता
