काठमांडू : नेपाळच्या विनाशकारी भूकंपाचा येथील १० अब्ज रुपयांच्या पर्यटन उद्योगावर विपरीत परिणाम होऊ शकतो. देशाच्या गंगाजळीचा मुख्य स्रोत असलेल्या या उद्योगाला आगामी काळात भारतीयांसह दोन लाख आंतरराष्ट्रीय पर्यटकांना मुकावे लागू शकते.
आंतरराष्ट्रीय पर्यटक दूर राहण्याची शक्यता नेपाळसाठी चिंतेची सबब असली तरी सध्याच्या संकटकाळात विदेशी पर्यटकांची त्याला मोठी मदत होत आहे. अनेक विदेशी पर्यटकांनी नेपाळमध्ये राहूनच भूकंपपीडितांची सेवा करत आहेत. यातील काही जण आरोग्य शिबिरांत मदतनीसाची भूमिका बजावत असून काहींनी पीडितांसाठी जेवण तयार करण्याच्या कामात स्वत:ला झोकून दिले आहे.
इस्रायली पर्यटक शिर शार्लो यांनी सांगितले की, नेपाळी नागरिकांच्या आदरातिथ्याने मला येथे थांबून त्यांची मदत करण्यास भाग पाडले. भूकंप झाला तेव्हा शार्लो (वय २३) पोखरामध्ये होती. ती तातडीने देशाच्या दूतावासात पोहोचली. तेथे तिला इस्रायलच्या आपत्कालीन उपचार शिबिराची माहिती मिळाली. त्यानंतर तिने नेपाळमध्येच राहून पीडितांची सेवा करण्याचा निर्णय घेतला.
‘संकटाच्या काळात गरजूंची मदत करणे ही माझी जबाबदारी आहे,’ असे इस्रायलचेच अन्य एक पर्यटक हादर जादोक यांनी सांगितले. दुसरीकडे भूकंपाची नेपाळच्या पर्यटन उद्योगाला मोठी झळ बसली आहे. पुढील चार महिन्यांत दोन लाखांहून अधिक आंतरराष्ट्रीय पर्यटक आपला नेपाळ दौरा रद्द करतील, अशी भीती या उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केली आहे.
.........................
एशिया ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या नेपाळ शाखेचे अध्यक्ष सुमन पांडे म्हणाले की, नैसर्गिक संकटामुळे यावर्षी आॅगस्टपर्यंत नेपाळमध्ये अपेक्षित २.७५ लाख पर्यटकांत ७५ टक्क्यांची घट होऊ शकते. भारतीयांना जी स्मारके आकर्षित करत होती तीच भूकंपात गडप झाली असल्यामुळे भारतातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक घटेल. उन्हाळ्यात नेपाळमध्ये येणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांत भारतीयांची संख्या जवळपास २० टक्के आहे. सप्टेंबरनंतर नेपाळच्या पर्यटन व्यवसायात सुधारणा होईल, असे पांडे म्हणाले.
नेपाळच्या भूकंपाचा पर्यटनास हादरा
नेपाळच्या विनाशकारी भूकंपाचा येथील १० अब्ज रुपयांच्या पर्यटन उद्योगावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
By admin | Updated: May 6, 2015 22:31 IST2015-05-06T22:31:59+5:302015-05-06T22:31:59+5:30
नेपाळच्या विनाशकारी भूकंपाचा येथील १० अब्ज रुपयांच्या पर्यटन उद्योगावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
