क्याण : पूर्वेच्या पाणीप्रश्नावरून कल्याण-डोंबिवली महापालिकेची सलग तिसरी महासभाही अभूतपूर्व गदारोळाने गाजली. गेल्या ४ वर्षांपासून पोटतिडकीने पाणीप्रश्न मांडूनही तो सुटू न शकल्याच्या निषेधार्थ मनसेचे नगरसेवक नरेंद्र गुप्ते यांनी राजीनामा दिला़ मात्र, महापौरांनी तो नाकारला़ राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सभात्याग करून आपला निषेध नोंदविला. गेल्या तीन महासभांमध्ये हा पाणीप्रश्न सतत पेटत असल्याने शुक्रवारच्या महासभेतही त्याचे पडसाद उमटणार, हे निश्चित होते. त्यातच जोपर्यंत पाणीप्रश्न सुटणार नाही, तोपर्यंत महासभा होणार नसल्याचा पवित्रा दस्तुरखुद्द महापौर कल्याणी पाटील यांनी घेतला होता. याउपरही समस्या कायम राहिल्याने शुक्रवारी महासभा सुरू होताच पूर्वेकडील नगरसेवकांनी ठिय्या मांडून ती न चालविण्याचे आवाहन महापौरांना केले. या वेळी महापौर आणि आयुक्तांच्या निषेधाचे फलक सभागृहात फडकविल्याने वातावरण चांगलेच तापले होते. पाणी द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा, पाणीप्रश्न न सोडविणार्या महापौरांचा निषेध अशा घोषणांनी सभागृह दणाणून सोडले. या वेळी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी गढूळ पाण्याच्या बाटल्याही सभागृहात दाखवून सत्ताधारी आणि प्रशासनाचा निषेध केला. पूर्वेकडील पाणीप्रश्नावर चर्चा सुरू असताना शिवसेना नगरसेवक वामन म्हात्रे यांनी डोंबिवलीचे पाणी पूर्वेसाठी मिळणार नाही, असे विधान केल्यामुळे विरोधक आणखीनच संतप्त झाले. एकीकडे विरोधक कमालीचे आक्रमक झालेले असतानाच सत्ताधार्यांनी मात्र विरोधकांवर मिश्किल शेरेबाजी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. तर दुसरीकडे नगरसेवकपदाचा कार्यकाळ संपायला आला तरी अद्याप कल्याण पूर्वेचा पाणीप्रश्न न सुटल्याने निराश झालेल्या मनसे नगरसेवक गुप्ते यांनी राजीनामा महापौरांना सादर केला. त्यावरही सत्ताधारी शिवसेनेने टीका करून हे राजीनामानाट्य म्हणजे केवळ स्टंटबाजी असल्याचा आरोप केल्याने सभागृहातील गोंधळात अधिकच भर पडली. नंतर, महापौरांनी हा राजीनामा नाकारला़ त्यातच पाणीप्रश्नावर प्रदीर्घ चर्चा होऊनही सत्ताधारी आणि प्रशासन तो सोडविण्यासाठी आणखी वेळ मागत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी गढूळ पाण्याच्या बाटल्या सभागृहात भिरकावून सभात्याग केला. तब्बल साडेचार तास चाललेल्या पाणीप्रश्नावर निर्देश देताना महापौरांनी येत्या रविवारी कल्याण पूर्वेतील पाणीसमस्या असलेल्या ठिकाणांची पदाधिकारी आणि नगरसेवकांसह पाहणी करणार असल्याचे सांगितले. तसेच गुढीपाडव्यानिमित्त उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डोंबिवलीत येत असून त्यांच्याशी वाढीव पाणीकोटा देण्याबाबत चर्चा करू, असे त्या म्हणाल्या. (प्रतिनिधी)
पाणीप्रश्नावरून महासभेत अभूतपूर्व गदारोळ राष्ट्रवादीचा सभात्याग : मनसे नगरसेवकांचे राजीनामानाट्य
कल्याण : पूर्वेच्या पाणीप्रश्नावरून कल्याण-डोंबिवली महापालिकेची सलग तिसरी महासभाही अभूतपूर्व गदारोळाने गाजली. गेल्या ४ वर्षांपासून पोटतिडकीने पाणीप्रश्न मांडूनही तो सुटू न शकल्याच्या निषेधार्थ मनसेचे नगरसेवक नरेंद्र गुप्ते यांनी राजीनामा दिला़ मात्र, महापौरांनी तो नाकारला़ राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सभात्याग करून आपला निषेध नोंदविला.
By admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:00+5:302015-03-20T22:40:00+5:30
कल्याण : पूर्वेच्या पाणीप्रश्नावरून कल्याण-डोंबिवली महापालिकेची सलग तिसरी महासभाही अभूतपूर्व गदारोळाने गाजली. गेल्या ४ वर्षांपासून पोटतिडकीने पाणीप्रश्न मांडूनही तो सुटू न शकल्याच्या निषेधार्थ मनसेचे नगरसेवक नरेंद्र गुप्ते यांनी राजीनामा दिला़ मात्र, महापौरांनी तो नाकारला़ राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सभात्याग करून आपला निषेध नोंदविला.
