- मनोज गडनीस, मुंबई
दरवर्षीप्रमाणे यंदाही मे महिन्याच्या झळांचा फटका शेअर बाजाराला बसण्याची चिन्हे असून याची चुणूक एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या पडझडीतून दिसून आली. यामुळे भारतीय शेअर बाजाराच्या सहा महिन्यांच्या तेजीला अल्पस्वरूपाचा ब्रेक लागण्याची चिन्हे आहेत.
‘सेल इन मे अँड गो अवे’ ही म्हण जगभरातील शेअर बाजारात लोकप्रिय असून, याचा अर्थ म्हणजे मे महिन्यात जगभरातील शेअर बाजारात गुंतवणूकदारांचा कल हा मोठ्या प्रमाणावर विक्रीकडे असतो.
एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात व्यवहाराच्या शेवटच्या तीन दिवसांत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या सेन्सेक्समध्ये ६०० पेक्षा जास्त अंशांची घसरण नोंदविली आहे. १ मे रोजी रविवार होता, परंतु २ मेपासून नियमित व्यवहारांना सुरुवात झाली. त्यातही शेअर बाजार १७० अंशांनी कोसळला. बाजार विश्लेषकांच्या मते, मे महिन्याचा ‘इफेक्ट’ आता बाजारात दिसण्यास सुरुवात होईल. २००१ या वर्षापासून ते २०१५ पर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकली तर सेन्सेक्समध्ये किमान २.५ टक्के ते कमाल १५ टक्के घसरण झाली आहे. सरासरी ही घसरण किमान पाच ते साडेपाच टक्के इतकी आहे. या पार्श्वभूमीवर यंदाची सुरुवात ही घसरणीने झाल्यामुळे मे महिन्याच्या झळांचा शेअर बाजाराला फटका बसण्याचे संकेत असल्याचे मत बाजार विश्लेषक अजय शहा यांनी व्यक्त केले. त्यातच यंदा आशिया खंडातील बाजाराच्या पडझडीला एक प्रमुख कारण मिळाले आहे ते म्हणजे जपानचे. ‘द बँक आॅफ जपान’ या जपानच्या शिखर बँकेने तेथील अर्थव्यवस्थेला आणि उद्योगाला संजीवनी देणारे मदत पॅकेज बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेक बाजारांतून अस्वस्थतेचे वातावरण आहे. तर दुसरीकडे सध्या संसदेच्या सत्रात भाजपा आणि कॉँग्रेसमध्ये सुरू असलेल्या राजकीय वादामुळे आर्थिक सुधारणा पुन्हा खोळंबल्याचे चित्र आहे. परिणामी अनेक परकीय वित्तीय संस्था आणि देशी वित्तीय संस्था बाजारातून आपला नफा नोंदवत काही काळ बाहेर राहण्याच्या मन:स्थितीत दिसत आहेत.
शेवटच्या आठवड्यात अधिक पडझड
- मे महिन्यात भारतीय शेअर बाजारात होणाऱ्या पडझडीचा गेल्या पंधरा वर्षांचा ट्रेंड तपासला तर शेवटचे दोन आठवडे सातत्याने बाजारात मोठी पडझड दिसते तर शेवटच्या आठवड्यात सेन्सेक्स तीन ते चार सत्रांतील व्यवहारांत किमान एक हजार अंकांपर्यंत घसरतो.
- गेल्या वर्षी सेन्सेक्समध्ये साडेपाच टक्क्यांची पडझड झाली होती. वित्तीय संस्था आणि अन्य गुंतवणूकदारांनी सुमारे
3374 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली होती.
शेअर बाजाराने दिला १२ टक्क्यांचा परतावा...
गेल्या आर्थिक वर्षात भारतीय अर्थकारणात काही प्रमाणात दिसून आलेला सुधार व त्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात असलेली तेजी विचारात घेता, या कालावधीत भारतीय शेअर बाजाराने सरासरी १२ टक्क्यांचा परतावा दिला आहे. काही इंडेक्समधून गुंतवणूकदारांना १८ टक्क्यांपर्यंतही परतावा मिळाला आहे.