बाजाराच्या निर्देशांकांनी गाठलेल्या नवीन उंचीनंतर बाजारावर नफा कमविण्यासाठी करण्यात आलेल्या विक्रीचा मोठा दबाव आल्याने सप्ताहाच्या अखेरीस बाजारात घसरण होऊनही सलग चौथ्या सप्ताहात निर्देशांकाने वाढीव पातळी गाठली. सप्ताहाच्या अखेरीस अमेरिकेची रोजगारविषयक आकडेवारी जाहीर होणार होती. त्याचप्रमाणे आगामी सप्ताहात सर्वोच्च न्यायालयाकडून कोळसा खाणीबाबत पुढील आदेश येण्याची शक्यता असल्याने याबाबतही सावधपणे हालचाली होताना दिसत आहेत.
मुंबई शेअरबाजाराचा संवेदनशील निर्देशांक गेल्या सप्ताहात २८९ अंश म्हणजेच १.४६ टक्क्यांनी वाढून २७०२७ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक (निफ्टी) १३२ अंश म्हणजेच १.६७ टक्के वाढला. सप्ताहाच्या अखेरीस तो ८०८७ अंशांवर होता. मिडकॅप निर्देशांक ४ टक्क्यांनी तर स्मॉलकॅप निर्देशांक ३.५ टक्क्यांनी वाढलेला दिसून आला.
सप्ताहामध्ये निर्देशांकांनी नवीन उच्चांक नोंदविल्यानंतर अखेरच्या दोन दिवसांत बाजारावर विक्रीचा मोठा दबाव आलेला दिसला. परकीय वित्त संस्था तसेच देशांतर्गत वित्तसंस्थांनीही विक्री करून नफा कमविण्याचा मार्ग पत्करल्याने दोन दिवस बाजार खाली आला. असे असले तरी सप्ताहाची गोळा-बेरीज मात्र हिरव्या रंगात दिसून आली.
गेल्या सप्ताहात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील खनिज तेलाच्या कमी झालेल्या किमती ही भारतासाठी समाधानाची बाब मानावी लागते. किमती कमी झाल्याने भारताला खर्च करावे लागणारे परकीय चलन आता कमी प्रमाणात द्यावे लागेल. यामुळे देशाच्या चालू खात्यावरील तूट कमी होण्याची शक्यता वाढीला लागली आहे. खनिज तेल स्वस्त झाल्याने देशाच्या आर्थिक विकासदरातही काही प्रमाणात वाढ संभवते. त्यामुळे स्वस्त खनिज तेल ही चांगली बाब मानावी लागेल.
या सप्ताहात युरोपियन सेंट्रल बँकेच्या नियामक मंडळाची बैठक होऊन त्यामध्ये व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे आर्थिक वाढीसाठी काही योजना येण्याची शक्यता वाढीस लागली आहे. यामुळे जगभरातील शेअर बाजारांना उभारी मिळू शकते, असे मत व्यक्त होत आहे.
सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी अमेरिकेतील रोजगारविषयक तसेच अन्य आर्थिक आकडेवारी जाहीर होणार होती. ही आकडेवारी चांगली असण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने त्यानुसार आगामी सप्ताहात बाजाराची वाटचाल कशी राहणार ते ठरणार आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य वाढत आहे.
सलग चौथ्या सप्ताहामध्ये बाजारात तेजी
निर्देशांकांनी गाठलेल्या नवीन उंचीनंतर बाजारावर नफा कमविण्यासाठी करण्यात आलेल्या विक्रीचा मोठा दबाव आल्याने सप्ताहाच्या अखेरीस बाजारात घसरण होऊनही सलग चौथ्या सप्ताहात निर्देशांकाने वाढीव पातळी गाठली
By admin | Updated: September 8, 2014 03:46 IST2014-09-08T03:46:20+5:302014-09-08T03:46:20+5:30
निर्देशांकांनी गाठलेल्या नवीन उंचीनंतर बाजारावर नफा कमविण्यासाठी करण्यात आलेल्या विक्रीचा मोठा दबाव आल्याने सप्ताहाच्या अखेरीस बाजारात घसरण होऊनही सलग चौथ्या सप्ताहात निर्देशांकाने वाढीव पातळी गाठली
