विजयकुमार सैतवाल -
जागतिक बाजारातील तेजी-मंदी, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे ठरणारे मूल्य, हंगामी मागणी, ‘मल्टी कमोडिटी एक्सचेंज’ (एमसीएक्स) अर्थात सोने-चांदीतील सट्टा बाजार तसेच आयात शुल्क यासारख्या विविध कारणांमुळे मावळत्या वर्षात सराफ बाजारात अस्थिरता राहिली. परिणामी सोने-चांदीच्या भावात सतत चढ-उतार व यातून ग्राहकांची बदलणारी मानसिकता यामुळे भाव कमी असताना खरेदीच्या ‘सुवर्णकाळात’ही सोन्याची चमक फिकीच राहिली व चांदीतही मंदी दिसून आली.
२०१४ वर्षाच्या सुरुवातीलाच सोन्याचे भाव प्रती तोळा तीस हजारांच्या पुढे होते. मात्र मार्च महिन्यानंतर यामध्ये सुरू झालेली घसरण वर्षभर कायम राहून अखेरपर्यत त्यात वाढ होऊन हा आकडा तीस हजारांपर्यंत पोहचू शकला नाही. चांदीच्या बाबतीतही असेच चित्र राहून केवळ मार्च व जुलै महिन्याचा अपवाद वगळला तर चांदीचेही भाव घसरतच राहिले. यात डिसेंबर महिन्यात तर एकदम तीन हजार रुपये प्रती किलोने भाव घसरल्याने व्यावसायिकांसह ग्राहकही धास्तावले.
सोने-चांदीतील या सततच्या घसरणीमुळे त्यांच्या भावात तर मंदी राहिलीच शिवाय ग्राहकीवरसुद्धा त्याचा परिणाम दिसून आला. भाव कमी झाले म्हणून या मौल्यवान धातूंना मागणी वाढेल, असे वाटत असले तरी तसे होऊ शकले नाही. कारण आता खरेदीदारांचीही मानसिकता बदलली आहे.
सोने हे हौस म्हणून अलंकारांच्या स्वरूपात वापरले जाते, मात्र चांदीचा वेगवेगळ््या कारणासाठी वापर वाढला आहे. ज्यामध्ये दागिन्यांसह विजेच्या उपकरणात तसेच चांदीच्या भांड्यानाही मागणी वाढत आहे. विशेष म्हणजे गुंतवणूक म्हणून चांदी खरेदीकडेही अनेकांचा कल आहे. यामुळे चार वर्षांपूर्वी चांदी ७५,००० रुपये प्रती किलोवर पोहचली होती. मात्र त्यांनंतर होत गेलेल्या घसरणीमुळे चांदीच्या मागणीसह तिचे भाव घसरतच गेले. यावषीर्ही ही घसरण कायम राहिली.
जळगावचा सराफ बाजार हा सोन्याची शुद्धता व व्यवहारातील पारदर्शकता आणि सचोटी यासाठी ‘सुवर्णनगरी’ म्हणून विख्यात आहे. दूरवरून खरेदीदार येथे येतात. यामुळे देशभरातील सुवर्णव्यावसायिकांचे येथील भावपातळीकडे कायम लक्ष असते. याबाबत येथील व्यावसायिकांचे म्हणण्यानुसार सध्या ‘मल्टी कमोडिटी एक्सचेंज’ या सोने-चांदीतील सट्टा बाजाराने व्यावसायिकांसह गुंतवणूकदारांनाही मोठा फटका सहन करावा लागत आहे. या सट्ट्यामुळे सोने-चांदीचे भाव सतत अस्थिर राहत आहे. यावर्षीही याचा प्रचंड प्रमाणात परिणामी होऊन सराफ बाजार अस्थिर राहिला.
संपूर्ण वर्षभर भावातील घसरण तात्पुरती असेल, नेहमीच्या अनुभवाप्रमाणे परिस्थितीे बदलली की भाव तेजाळतील, असा विश्वासाने दावा करणारे सराफ व्यावसायिक मात्र अस्वस्थ असून यापुढेही भाव कसे असतील याबाबत काहीही निश्चित सांगण्याच्या मनस्थितीत नाहीत.
‘सुवर्ण’काळातही बाजार फिका
जागतिक बाजारातील तेजी-मंदी, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे ठरणारे मूल्य, हंगामी मागणी, ‘मल्टी कमोडिटी एक्सचेंज’ (एमसीएक्स) अर्थात सोने-
By admin | Updated: December 18, 2014 04:54 IST2014-12-18T04:54:19+5:302014-12-18T04:54:19+5:30
जागतिक बाजारातील तेजी-मंदी, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे ठरणारे मूल्य, हंगामी मागणी, ‘मल्टी कमोडिटी एक्सचेंज’ (एमसीएक्स) अर्थात सोने-
