मुंबई : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात अपेक्षित असलेली व्याजदर कपात न झाल्यामुळे निराश झालेल्या गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराकडे पाठ फिरविली. परिणामी बाजार कोसळला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ११५ अंकांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा सीएनएक्स निफ्टी ३१.२0 अंकांनी कोसळला. शेअर बाजाराच्या घसरणीचा हा सलग दुसरा दिवस ठरला.
शेअर बाजारात कालपासूनच सतर्कता होती. त्यामुळे आज सकाळी बाजार उघडला तेव्हा बरेचसे अनिश्चित वातावरण होते. सेन्सेक्स मंदीवर खुला झाला. नंतर तो थोडासा सुधारला. एका क्षणी तो २८,५७६.३९ अंकांपर्यंत वर चढला होता. रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर झाल्यानंतर मात्र, तो घसरणीला लागला. सत्राअखेरीस ११५.६१ अंकांची अथवा 0.४0 टक्क्यांची घसरण नोंदवून सेन्सेक्स २८,४४४.0१ अंकांवर बंद झाला. काल तो १३४.३७ अंकांनी कोसळला होता.
व्यापक आधार असलेला ५0 कंपन्यांवर आधारित सीएनएक्स निफ्टी ३१.२0 अंकांनी अथवा 0.३६ टक्क्यांनी कोसळून ८,५२४.७0 अंकांवर बंद झाला.
बाजारातील जाणकारांनी सांगितले की, व्याजदर कपातीची अपेक्षा बाजाराकडून व्यक्त केली जात होती. तथापि, व्याजदर कपातीचा काळ अजून आला नाही, असे रिझर्व्ह बँकेला वाटते. फेब्रुवारी २0१५ मधील अर्थसंकल्पापूर्वी रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कपात होईल, असे वाटत नाही.
सेन्सेक्समधील गेल, एमअँडएम, एचडीएफसी हीरोमोटोकॉर्प या कंपन्यांना घसरण सहन करावी लागली. आयसीआयसीआय बँक आणि अॅक्सिस बँक यांसह बँकिंग क्षेत्रातील बहुतांश शेअर्स वर चढले. आयटी, आॅटो, तेल आणि गॅस क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्रीचा जोर दिसून आला. पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात झालेली वाढ तेल आणि गॅस कंपन्यांसाठी हानिकारक ठरली.
सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरण नोंदली गेली असली तरी बाजाराचा एकूण व्याप मात्र सकारात्मक राहिला. छोट्या गुंतवणूकदारांनी बाजाराला तारले. बीएसई मीडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात अनुक्रमे 0.९१ टक्के आणि 0.५५ टक्के वाढ झाली.
सेन्सेक्समधील ३0 पैकी १७ कंपन्यांचे समभाग घसरले. १३ कंपन्यांचे समभाग वाढले. बाजाराचा एकूण व्याप सकारात्मक राहिला. १,५0८ कंपन्यांचे समभाग वाढीने बंद झाले.
१,४१९ कंपन्यांचे समभाग घसरले. १२७ कंपन्यांनी आदल्या दिवशीची पातळी कायम ठेवण्यात यश मिळविले. बाजारातील एकूण उलाढाल ३,३३२.२१ कोटी रुपये राहिली. काल ती ३,१६0.९४ कोटी होती. (प्रतिनिधी)
सलग दुसऱ्या दिवशी बाजार कोसळला
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात अपेक्षित असलेली व्याजदर कपात न झाल्यामुळे निराश झालेल्या गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराकडे पाठ फिरविली.
By admin | Updated: December 3, 2014 00:35 IST2014-12-03T00:35:25+5:302014-12-03T00:35:25+5:30
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात अपेक्षित असलेली व्याजदर कपात न झाल्यामुळे निराश झालेल्या गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराकडे पाठ फिरविली.
