Lokmat Money > बिझनेस न्यूज > महाराष्ट्राचा १ ट्रिलियन डॉलर्सचा दूरदर्शी आराखडा: महत्त्वाकांक्षा आणि कृतीशीलतेची ताकद - भरत गीते

महाराष्ट्राचा १ ट्रिलियन डॉलर्सचा दूरदर्शी आराखडा: महत्त्वाकांक्षा आणि कृतीशीलतेची ताकद - भरत गीते

क्षमता आणि आश्वासकतेने परिपूर्ण असे महाराष्ट्र राज्य, हे एक परिवर्तनात्मक झेप घेण्यासाठी सज्ज आहे. $512 अब्ज GDP (सकल देशांतर्गत उत्पादन) असलेले हे गतिमान राज्य पुढील पाच वर्षांत भारताची पहिली $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था होण्याचा उल्लेखनीय टप्पा गाठण्यासाठी तयार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2025 16:44 IST2025-05-07T16:40:46+5:302025-05-07T16:44:49+5:30

क्षमता आणि आश्वासकतेने परिपूर्ण असे महाराष्ट्र राज्य, हे एक परिवर्तनात्मक झेप घेण्यासाठी सज्ज आहे. $512 अब्ज GDP (सकल देशांतर्गत उत्पादन) असलेले हे गतिमान राज्य पुढील पाच वर्षांत भारताची पहिली $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था होण्याचा उल्लेखनीय टप्पा गाठण्यासाठी तयार आहे.

Maharashtra's $1 trillion visionary plan: The power of ambition and action - Bharat Geete | महाराष्ट्राचा १ ट्रिलियन डॉलर्सचा दूरदर्शी आराखडा: महत्त्वाकांक्षा आणि कृतीशीलतेची ताकद - भरत गीते

महाराष्ट्राचा १ ट्रिलियन डॉलर्सचा दूरदर्शी आराखडा: महत्त्वाकांक्षा आणि कृतीशीलतेची ताकद - भरत गीते

भरत गीते - MD & CEO at Taural India (तौरल इंडिया)

क्षमता आणि आश्वासकतेने परिपूर्ण असे महाराष्ट्र राज्य, हे एक परिवर्तनात्मक झेप घेण्यासाठी सज्ज आहे. $512 अब्ज GDP (सकल देशांतर्गत उत्पादन) असलेले हे गतिमान राज्य पुढील पाच वर्षांत भारताची पहिली $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था होण्याचा उल्लेखनीय टप्पा गाठण्यासाठी तयार आहे. याचा उद्देश केवळ आर्थिक पिरॅमिडच्या शिखरावर पोहोचणे हा नसून, एका अशा वातावरणाची निर्मिती करणे हा आहे जे वातावरण सर्व प्रकारच्या व्यवसायांची आणि उद्योगांची भरभराट होण्यासाठी पोषक असेल आणि त्याचबरोबर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी फायदेशीर ठरेल.

इथे या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टापर्यंत आपण कधी पोहोचू, याही पेक्षा हा विकास कसा घडवून आणता येईल आणि त्याची सुरुवात कुठून करता येईल हा मुद्दा जास्त महत्वाचा आहे. आपली आर्थिक झेप ही आपली सामूहिक महत्वाकांक्षा आणि ठोस कृती यावर अवलंबून आहे. मागील दहा वर्षात भारताने उद्योजकतेमध्ये अभूतपूर्व वाढ पाहिली आहे, ज्यात सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. जर आपल्याला आपल्या राज्याचा विकास असाच सुरु ठेवायचा असेल, तर आपण महानगरांपलीकडे जाऊन Tier II आणि Tier III क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि तिथे उपलब्ध असलेल्या भरपूर संधींचा पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे. या क्षेत्रांमध्ये कौशल्य, कल्पकता आणि उद्योजकता ह्या सर्व गोष्टी प्रकर्षाने आढळून येतात, आणि त्या जोपासण्यासाठी आपण एक पोषक वातावरण तयार केले पाहिजे.

लाइसन्स मिळवण्यात येणारे अडथळे, जमिनीच्या अधिग्रहणातील अडचणी, वित्तपुरवठ्याचा अभाव आणि जटिल नियम या सर्व गोष्टींवर यशस्वीरीत्या मात करण्यासाठी नेतृत्व हा एक अतिशय महत्वाचा घटक आहे. महाराष्ट्रामध्ये असण्याचे असंख्य फायदे असूनसुद्धा येथे व्यवसाय करणे कठीण असल्याची धारणा आजही कायम आहे. जर आपल्याला आपल्या राज्याच्या क्षमतेचा संपूर्ण वापर करायचा असेल, तर त्यासाठी आपण संरचनात्मक सुधारणा करणे आणि व्यवसायासाठी अधिक अनुकूल असा दृष्टिकोन स्वीकारणे गरजेचे आहे. $1 ट्रिलियनच्या अर्थव्यवस्थेच्या दिशेने आपली जी वाटचाल आहे, ती यशस्वी होण्यासाठी व्यापक, समावेशी आणि वैविध्यपूर्ण वाढ घडवून आणणे अतिशय महत्वाचे आहे.

जर आपण मागे वळून पहिले, तर आयटी सेवेला एक प्रकारे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणता येऊ शकेल. पण असे असले तरीही आपल्या पुढील विकासासाठी मात्र आपण औद्योगिक उत्पादन, वस्तू निर्मिती आणि मोठ्या उद्योगांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. औद्योगिक क्लस्टर्सचे सशक्तीकरण, पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आणि जगभरातील सर्वोत्तम पद्धतींची अंमलबजावणी या सर्वांद्वारे महाराष्ट्र प्रगत उत्पादनामध्ये राष्ट्रीय पातळीवर आपले स्थान नक्कीच निर्माण करू शकेल. या धोरणात्मक संक्रमणामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक मूल्य निर्माण होईल आणि शहरी तसेच अर्धशहरी क्षेत्रांमध्ये हजारो उच्च गुणवत्तेच्या संधी उपलब्ध होतील. याचप्रमाणे, महाराष्ट्राच्या आर्थिक परिप्रेक्ष्यात महत्त्वपूर्ण असलेले सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSMEs) विकासाच्या या टप्प्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. मोठ्या उद्योगांमुळे स्थैर्य येईल, तर MSMEs च्या गतिमान वाढीमुळे आर्थिक विस्तार वाढेल. म्हणूनच ह्या उद्योगांसाठी वित्तपुरवठ्याची उपलब्धता वाढवणे, नियामक प्रक्रियांचे सरलीकरण करणे व लक्षित कौशल्यवृद्धी उपक्रमांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. MSME ना पाठिंबा दिल्याने नाविन्यपूर्ण परिसंस्थेला चालना तर मिळेलच, पण त्याचबरोबर विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधींमध्ये लक्षणीय वाढ सुद्धा होईल.

परदेशी गुंतवणूक महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचा मुख्य आधारस्तंभ ठरेल. परंतु, केवळ आपल्या सामर्थ्यांचे प्रदर्शन करणे पुरेसे नाही. आजच्या गुंतवणूकदारांना व्यवसाय करण्याची सोय, धोरणांमधील स्थिरता आणि पारदर्शक कार्यप्रणाली हवी असते. महाराष्ट्र त्याच्या भौगोलिक स्थितीमुळे, मजबूत औद्योगिक पायामुळे आणि समृद्ध कौशल्य गटामुळे गुंतवणुकीसाठी एक आकर्षक केंद्र आहे. या फायद्यांचा पुरेपूर वापर करण्यासाठी आपण जागतिक गुंतवणूकदारांसमोरील अडथळे सक्रियपणे दूर करायला पाहिजेत. जागतिक दर्जाचे औद्योगिक झोन तयार करणे, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे व आंतरराष्ट्रीय व्यावसायिक समुदायांबरोबर अधिक सखोल सहकार्य करणे, हे महाराष्ट्राला भारतातील गुंतवणुकीचे प्रमुख ठिकाण म्हणून स्थापित करेल.

आपली महत्वाकांक्षी उद्दिष्ठ्ये साध्य करण्यासाठी आपल्याला आपला दृष्टिकोन बदलायला हवा, ज्यामध्ये व्यवसाय, कामगार आणि गुंतवणूकदारांच्या गरजा समजून घेऊन त्या पूर्ण करण्याला प्राधान्य दिले पाहिजे. 

अर्थपूर्ण वाढ म्हणजे केवळ धोरणात छोटे बदल करणे नव्हे, तर स्पर्धात्मकतेला चालना देण्यात येणारे अडथळे ओळखून त्यांना सामूहिकपणे दूर करणे सुद्धा आहे. सरकार आणि उद्योग यांच्यातील सखोल सहकार्य एक समृद्ध आर्थिक परिप्रेक्ष्य निर्माण करेल, ज्यामध्ये पायाभूत सुविधा, कामगार विकास, आणि प्रोत्साहन आपल्या व्यापक विकासाच्या दृष्टीकोनाशी सुसंगत असतील.

ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने प्रगतीच्या ह्या प्रवासात संपूर्ण देशाची नजर महाराष्ट्रावर आहे. हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्याला धाडसी आणि निर्णायक कृतींची आवश्यकता आहे. ह्यासाठी आपल्याला केवळ छोट्या-छोट्या सुधारणा करण्यापलीकडे जायला लागेल व एकसंध प्रयत्न करावे लागतील. व्यवसायांना नाविन्यपूर्ण आणि लवचिक करावे लागेल, धोरणकर्त्यांना पारदर्शक आणि कार्यक्षम वातावरण तयार करावे लागेल, आणि कामगारांना भविष्याच्या दृष्टिने आवश्यक कौशल्ये आत्मसात करावी लागतील.

यशाचे सूत्र स्पष्ट आहे: महत्वाकांक्षेला निर्धाराची साथ असावी, तसेच दूरदर्शी कल्पना ठोस कृतीत रूपांतरित व्हाव्यात. महाराष्ट्र नेहमीच संधी आणि उद्योजकतेचे प्रतीक राहिला आहे. मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित करून आपण प्रतीकात्मक $1 ट्रिलियनचे लक्ष्य पार करू शकतो आणि भारताची सर्वात गतिशील आणि भविष्यवादी अर्थव्यवस्था होऊ शकतो. कृती करण्याची हीच ती वेळ. चला तर मग, या रोमांचक प्रवासाला एकत्र सुरुवात करूया!

Web Title: Maharashtra's $1 trillion visionary plan: The power of ambition and action - Bharat Geete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.