>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - महागडे पण अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे लोकप्रिय असलेले आयफोन आता महाराष्ट्रात तयार होण्याची दाट शक्यता असून आयफोनचा प्रकल्प राज्यात सुरु झाल्यास देशभरात स्वस्तात आयफोन मिळू शकतील. तैवानमधील फॉक्सकॉन कंपनीने भारतात प्रकल्प सुरु करण्यासंदर्भात आयफोनशी चर्चा सुरु केली आहे.
फॉक्सकॉन ही तैवानमधील अग्रगण्य कंपनी असून २०२० पर्यंत फॉक्सकॉनने देशभरात १० -१२ प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यात उत्पादन प्रकल्प व डाटा सेंटरचा समावेश आहे. फॉक्सकॉनची आयफोन तयार करणा-या अॅपलसोबत भारतात उत्पादन सुरु करण्यासंदर्भात चर्चा सुरु असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. याबाबत अॅपल व फॉक्सकॉनने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेत फॉक्सकॉनचे अधिकारी महिनाभरात राज्याचा दौरा करुन जागेची पाहणी करतील असे म्हटले आहे. फॉक्सकॉनला भारतात आयफोन, आयपॅडचे उत्पादन सुरु करायचे आहे असे सूचक व्यक्तव्यही देसाई यांनी केले आहे. त्यामुळे आयफोनचा प्रकल्प राज्यात होतो का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.