नवीदिल्ली : विमा एजंटांसाठी गरजेचे असणारे लायसन्स येत्या एक एप्रिलपासून रद्द होणार आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (इर्डा)ने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विमा कंपन्यांना आता आपल्या एजंटांची थेट नियुक्ती करता येणार आहे.
भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (इर्डा)चे अध्यक्ष टी. एस. विजयन यांनी ही माहिती दिली. कॉन्फेडरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय)तर्फे आयोजित एका कार्यक्रमाच्या वेळी पत्रकारांशी बोलतांना विजयन यांनी ही माहिती दिली. सध्या विमा एजंटांची नियुक्ती ईर्डा मार्फत केली जात होती. या एजंटला विमा व्यवसाय सुरू करण्यासाठी लायसन्स घेण्याची आवश्यकता होती. येत्या एक एप्रिलपासून अशा लायसन्सची गरज राहणार नसल्याचे विजयन यांनी सांगितले.
पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना विजयन यांनी सांगितले की, परकीय पुनर्विमा कंपन्यांना भारतामध्ये केवळ शाखा सुरू करून येथे गुंतवणुकीला परवानगी देण्याबाबतचा विचार सुरू आहे. या कंपन्यांना त्यासाठी येथे नोंदणी करण्याची गरज नसल्याचेही विजयन यांनी स्पष्ट केले. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. याआधी विजयन यांच्याहस्ते ‘इंडिया इन्शुरन्स व्हिजन २०१५’ या सीआयआयने तयार केलेल्या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. या अहवालामध्ये भारतामधील विमा व्यवसायाने आगामी काळात कशा पद्धतीने कार्य करावे याबाबतच्या सूचना केलेल्या आहेत. आगामी दशकात भारतातील जीवन विमा क्षेत्र वार्षिक १२ टक्के दराने वाढून १७५ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.भारतातील सर्वसाधारण विमा क्षेत्रातील वाढीचा वार्षिक वेग २२ टक्के राहण्याचा अंदाज असून त्यातील प्रिमियमची रक्कम ८० अब्ज डॉलरपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
विमा एजंटांसाठीचे लायसन्स होणार रद्द
विमा एजंटांसाठी गरजेचे असणारे लायसन्स येत्या एक एप्रिलपासून रद्द होणार आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (इर्डा)ने हा निर्णय घेतला आहे.
By admin | Updated: February 27, 2015 00:24 IST2015-02-27T00:24:59+5:302015-02-27T00:24:59+5:30
विमा एजंटांसाठी गरजेचे असणारे लायसन्स येत्या एक एप्रिलपासून रद्द होणार आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (इर्डा)ने हा निर्णय घेतला आहे.
