Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'जन-धना'ला जोड हवी आर्थिक विचारधनाची!

'जन-धना'ला जोड हवी आर्थिक विचारधनाची!

वित्त व्यवस्था तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी वित्तीय समयोजन धोरणांतर्गत जी 'जन-धन' योजना राबविली जात आहे, त्याद्वारे केवळ बँक खाती वाढणार नाही

By admin | Updated: October 10, 2014 11:47 IST2014-10-10T03:59:00+5:302014-10-10T11:47:34+5:30

वित्त व्यवस्था तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी वित्तीय समयोजन धोरणांतर्गत जी 'जन-धन' योजना राबविली जात आहे, त्याद्वारे केवळ बँक खाती वाढणार नाही

'Jan Dhanala' needs financial thought! | 'जन-धना'ला जोड हवी आर्थिक विचारधनाची!

'जन-धना'ला जोड हवी आर्थिक विचारधनाची!

मुंबई : वित्त व्यवस्था तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी वित्तीय समयोजन धोरणांतर्गत जी 'जन-धन' योजना राबविली जात आहे, त्याद्वारे केवळ बँक खाती वाढणार नाही तर यामुळे मोठी साखळी बांधली जाणार आहे; पण एकीकडे हे होत असतानाच वित्तीय शिक्षण, जागरूकता याचाही प्रसार व्हायला हवा, अशी भूमिका स्टेट बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी 'लोकमत'शी बोलताना विशद केली.
देशाच्या सरकारी बँकिग क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडियाच्या अध्यक्षपदी विराजमान असलेल्या अरुंधती भट्टाचार्य यांनी 'लोकमत'तर्फे प्रसिद्ध होणाऱ्या 'दीपोत्सव' या विशेषांकात सरळसेवा भरतीप्रक्रियेतून बँकेत अधिकारीपदापासून ते आता अध्यक्षपदापर्यंतचा साडेतीन दशकांचा प्रवास खास 'लोकमत'च्या वाचकांसाठी शब्दबद्ध केला आहे. देशाच्या अर्थकारणात ज्या व्यक्तीचा 'शब्द' महत्त्वाचा मानला जातो, अशा प्रभावशाली खुर्चीवर बसलेल्या अरुंधती भट्टाचार्य यांचा हा प्रवास प्रेरणेचा अन् तरुणांना हुरूप देणारा असा आहे.
स्टेट बँक आॅफ इंडिया इमारतीच्या मुख्यालयात 'लोकमत'च्या चमूशी बोलताना अरुंधती भट्टाचार्य यांनी, स्वत:च्या कारकीर्दीपासून ते देशाच्या अर्थकारणातील विविध घडामोडींवर भाष्य केले. त्यांच्या करिअरमधील सर्वात आकर्षणाचा घटक म्हणजे, देशाच्या कानाकोपऱ्यात काम करतानाच बँक व बँकिंग उद्योगाशी जोडल्या गेलेल्या विविध विभागांची धुरा त्यांनी सांभाळली आहे. एकाच व्यक्तीने जवळपास सर्वच विभागांचे प्रमुख पद भुषवून अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळण्याचा हा योग विरळा आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात काम करतानाच अमेरिकेतही बँकिंग आॅपरेशन करण्याची मोठी जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे.
अरुंधती भट्टाचार्य यांच्या रूपाने केवळ एका निष्णात बँकरच्या हाती स्टेट बँकेची धुरा असल्याने महिला सक्षमीकरणावर या चर्चेत विशेष ऊहापोह झाला. यावर अत्यंत सुस्पष्ट मते मांडताना त्या म्हणाल्या की, 'स्पर्धात्मकतेचा आणि आव्हानांचा सामना करताना अनेकवेळा महिला असणे, याला अनेक कंगोरे असल्याचेही जाणवते. अर्थात, वैयक्तिक पातळीवर कुटुंबापासून ते कार्यालयापर्यंत नेहमीच मला पुरुषांकडून प्रोत्साहन, प्रेरणा, सहकार्य मिळाले असले तरी 'महिला' हा घटक सखोलतेने समजून घेणे गरजेचे आहे. या मुद्याचा सखोल अभ्यास होऊन मानसिकतेत बदल झाला तर याची परिणती उद्योग-व्यवसायातील महिलांच्या संख्यावाढीच्या रूपाने दिसू शकेल. महिला आणि पुरुष या शारीरिक भेदापलीकडे जात नैसर्गिकरीत्या असलेल्या विचार प्रणालीच्या व दृष्टिकोनाच्या अनुषंगाने विचार व्हायला हवा. असे झाले तर, निश्चितच कामकाजातही एक नैसर्गिक समन्वय व सुवर्णमध्य साधला जाईल. (प्रतिनिधी)

Web Title: 'Jan Dhanala' needs financial thought!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.