इराकमध्ये उसळलेला हिंसाचार आणि त्यानंतर कच्च्या तेलाच्या दराने गाठलेली नऊ महिन्यांतील उच्चांकी पातळी यामुळे शेअर बाजार निर्देशांकांची घोडदौड रोखली गेली. आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर बाजारात अपेक्षित असलेले करेक्शन येऊ घातलेले दिसत आहे. चलनवाढ तसेच आयातीमध्ये झालेली घट, वाढत असलेली निर्यात आणि व्यापारातील कमी झालेली तूट, औद्योगिक उत्पादनामध्ये नोंदविली गेलेली वाढ या सकारात्मक बाबीही इराकच्या संकटामुळे झाकोळल्या गेल्या.
बाजाराच्या निर्देशांकांनी मागील सप्ताहात नवीन उच्चांकांची नोंद केल्यानंतर सप्ताहाच्या अखेरीस मात्र इराकमध्ये सुरू झालेल्या हिंसाचाराने बाजाराची घसरण झालेली दिसली. संवेदनशील निर्देशांकाने २५ हजार ७२५.१२ अशी नवीन उच्चांकी नोंद केल्यानंतर सप्ताहाच्या अखेरीस तो २५२२८.१७ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहाच्या बंद निर्देशांकाच्या तुलनेत त्यामध्ये १६८.२९ अंश (०.६६ टक्के) घट झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ७७०० अंशांच्या नवीन उच्चांकाची नोंद केल्यानंतर ४१.३० अंश (०.५४ टक्के) खाली येऊन ७५४२.१० अंशांवर बंद झाला. स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांकांमध्येही घट झाली. बाजारमध्ये उलाढाल मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून आले.
इराकमध्ये उसळलेल्या हिंसाचाराने तेथे यादवी सुरू होण्याची भीती निर्माण झाली असून त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्यातेलाच्या किमती भडकल्या आहेत.
इराकच्या यादवीने तेथील तेलउत्पादन मंदावण्याच्या भीतीने बाजार गारठला आणि त्यामुळेच विक्रीचा मारा होऊन निर्देशांकांच्या वाढीला ब्रेक लागला. वस्तुत: बाजारात करेक्शन येण्याची अपेक्षा होतीच मात्र त्यासाठी इराकचे निमित्त मिळाले. आर्थिक आघाडीवर गेला सप्ताह चांगला राहिला. मोदी सरकारकडून सादर होणाऱ्या आगामी अर्थसंकल्पाबाबत बाजाराच्या अनेक अपेक्षा आहेत. त्यातच देशाची अर्थव्यवस्था सुधारत असल्याचे संकेत मिळत आहेत. गतसप्ताहात जाहीर झालेली आकडेवारी निश्चितच दिलासा देणारी आहे. देशाची आयात कमी होऊन निर्यात वाढली. त्यामुळे व्यापारातील तूट कमी होऊन काहीसा समतोल निर्माण होत आहे, ही समाधानाची बाब आहे.
वीजनिर्मिती आणि औद्योगिक उत्पादनात झालेल्या वाढीमुळे औद्योगिक उत्पादन निर्देशांकात वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे घाऊक मूल्यावर आधारित चलनवाढही काहीशी कमी झाली आहे. या सर्व सकारात्मक घटकांचे प्रतिबिंब आगामी अर्थसंकल्पात पडावे आणि सवलतींचा वर्षाव व्हावा, ही बाजाराची अपेक्षा आहे.
निर्देशांकांच्या वाढीला इराकचा ब्रेक
इराकमध्ये उसळलेला हिंसाचार आणि त्यानंतर कच्च्या तेलाच्या दराने गाठलेली नऊ महिन्यांतील उच्चांकी पातळी यामुळे शेअर बाजार निर्देशांकांची घोडदौड रोखली गेली
By admin | Updated: June 16, 2014 04:15 IST2014-06-16T04:15:08+5:302014-06-16T04:15:08+5:30
इराकमध्ये उसळलेला हिंसाचार आणि त्यानंतर कच्च्या तेलाच्या दराने गाठलेली नऊ महिन्यांतील उच्चांकी पातळी यामुळे शेअर बाजार निर्देशांकांची घोडदौड रोखली गेली
