आज पतधोरण : आर्थिक वृद्धीदर ७.४ टक्क्यांवर
मुंबई : गेल्या पतधोरणावेळी रेपो दरात अर्धा टक्के दर कपात केल्यानंतर उद्या (एक डिसेंबर) सादर होणाऱ्या पतधोरणामध्ये व्याजदर जैसे थेच राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. मात्र, पतधोरणाच्या निमित्ताने अर्थव्यवस्थेचे जे आकडे प्रसिद्ध होत आहेत ते विचारात घेता, अर्थव्यवस्थेत तेजीचा शिरकाव होतानाच जुलै ते सप्टेंबर या कालावधीत ७.४ टक्क्यांचा विकास दर नोंदविला गेला.
विकासदरासंदर्भात उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, कमी मान्सून असला तरी देशांतर्गत अर्थकारणात येत असलेल्या तेजीमुळे विकासदराने समाधानकारक पातळी गाठली असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या तिमाहीतील विकासदरात चीनलाही भारतीय अर्थव्यवस्थेने मागे टाकले आहे. मूलभूत क्षेत्रातील विकासदरातही सुधारणा दिसून आली असून उत्पादन क्षेत्रातही काही प्रमाणात तेजी दिसत आहे. एकूणच अर्थव्यवस्थेतील सुधार विकासदरातील सुधारातून प्रतिबिंबित झाला आहे.