Lokmat Money > बिझनेस न्यूज > कॅलेंडर वर्षामध्ये निर्देशांकाची पहिलीच मासिक घसरण

कॅलेंडर वर्षामध्ये निर्देशांकाची पहिलीच मासिक घसरण

सन २०१७ या कॅलेंडर वर्षामध्ये प्रथमच निर्देशांकाने मासिक घसरण नोंदविली आहे. पहिल्या पाच महिन्यांमध्ये संवेदनशील निर्देशांकाने १६ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2017 00:32 IST2017-07-03T00:32:12+5:302017-07-03T00:32:12+5:30

सन २०१७ या कॅलेंडर वर्षामध्ये प्रथमच निर्देशांकाने मासिक घसरण नोंदविली आहे. पहिल्या पाच महिन्यांमध्ये संवेदनशील निर्देशांकाने १६ टक्के

The index's first monthly drop in calendar year | कॅलेंडर वर्षामध्ये निर्देशांकाची पहिलीच मासिक घसरण

कॅलेंडर वर्षामध्ये निर्देशांकाची पहिलीच मासिक घसरण

- प्रसाद गो. जोशी 
सन २०१७ या कॅलेंडर वर्षामध्ये प्रथमच निर्देशांकाने मासिक घसरण नोंदविली आहे. पहिल्या पाच महिन्यांमध्ये संवेदनशील निर्देशांकाने १६ टक्के वाढ दिल्यानंतर जून महिन्याच्या अखेरीस तो ०.७ टक्के खाली आला. जीएसटी लागू होण्याच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी घेतलेला सावध पवित्रा, परकीय वित्तसंस्थांकडून होत असलेली विक्री आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील तणावपूर्ण स्थिती यामुळे सप्ताहात निर्देशांक घसरले.
मुंबई शेअर बाजारात सप्ताहामध्ये साधारणत: मंदीचेच वातावरण दिसून आले. १ जुलैपासून लागू होणाऱ्या जीएसटीचे काय परिणाम होणार याबाबत बाजारात साशंकता असल्याने गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा स्वीकारला. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ३११९४.६८ अंशांवर खुला झाला तर सप्ताहाच्या अखेरीस तो ३०९२१.६१ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहाच्या बंद निर्देशांकाच्या तुलनेत त्यामध्ये २१६.६० अंश म्हणजे ०.७ टक्के घट झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांकही (निफ्टी) ०.५६ टक्कयांनी घसरून ९५२०.९० अंशांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्ये मात्र वाढ झालेली दिसून आली.
सप्ताहामध्ये परकीय वित्तसंस्था आणि परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बाजारातून ३१४.१८ कोटी रुपये काढून घेतले. जुलै महिन्याच्या फ्युचर्स व्यवहारांची झालेली चांगली सुरुवात हाच काय तो बाजारासाठी आशेचा किरण राहिला. अमेरिकेच्या नागरिकत्व आणि स्थलांतर विभागाने एच१बी व्हिसाची प्रकरणे ही वर्कलोड परमिट म्हणून लवकर प्रोसेस करण्याचा विचार सुरू असल्याचे जाहीर केल्याने माहिती तंत्रज्ञान उद्योगाला काहीसा दिलासा मिळाला आहे. मार्च महिन्यापासून हे व्हिसा प्राधान्याने विचारात घेतले जात नसल्याने हा उद्योग चिंतेत होता. आगामी सप्ताहामध्ये जीएसटीच्या परिणामांचे निष्कर्ष काढून पुढील वाटचाल होईल. मात्र तोपर्यंत वाट बघण्याचेच धोरण स्वीकारले जाणार असल्याने वाट खडतरच दिसते आहे.

बीएसई वाढविणार व्यवहार फी

मुंबई शेअर बाजाराने येत्या १ आॅगस्टपासून आपल्या व्यवहार फीमध्ये (ट्रॅन्झॅक्शन चार्जेस) वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला. छोटे व्यवहार करणाऱ्यांच्या शुल्कामध्ये यामुळे वाढ होणार आहे.

बाजाराच्या ए, बी व टी गटांमधील व्यवहारांवर आकारल्या जाणाऱ्या फीमध्ये सुधारणा करणार असल्याचे मुंबई शेअर बाजाराने जाहीर केले आहे. ही नवीन फी १ आॅगस्टपासून लागू होईल. ही फी ट्रेडिंग मेंबरला भरावी लागेल. आता एक लाखापर्यंतच्या प्रति व्यवहारावर रुपये १.५० फी आकारली जाणार आहे. एक लाख १ ते तीन लाखांपर्यंतच्या व्यवहारांवर रु. १.२५ प्रति व्यवहार आकारले जाणार आहेत.

मुंबई शेअर बाजाराने १ एप्रिल २०१७पासून आपल्या ट्रेडिंग मेंबर्सकडून व्यवहार फीची आकारणी सुरू केली आहे.

Web Title: The index's first monthly drop in calendar year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.