ग्रीसला मिळालेले पॅकेज आणि इराणने केलेला अणुकरार यामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये असलेल्या तेजीचा फायदा भारतीय शेअर बाजारालाही लाभला. या बळावर निर्देशांकाने सुमारे आठ शतकांची उसळी घेतली. मिडकॅप या क्षेत्रिय निर्देशांकाने नवीन उंची गाठत बाजारावर गुंतवणूकदारांचा विश्वास असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. बाजारातील उलाढाल कमी झाली.
मुंबई शेअर बाजारात गतसप्ताहात तेजीचे वातावरण होते. बाजाराचा संवेदनशील निर्देशांक २८५७६ ते २७६३५ अंशांदरम्यान हेलकावत होता. सप्ताहाच्या अखेरीस तो २८४६३.३१ अंशांवर स्थिरावला. मागील बंद निर्देशांकापेक्षा त्यामध्ये ८०१.९० अंश अर्थात २.९० टक्क्यांनी वाढ झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) २.९८ टक्के अर्थात २४९.३० अंश वाढून ८६०९.८५ अंशांवर बंद झाला. मुंबई, तसेच राष्ट्रीय शेअर बाजारामध्ये गतसप्ताहापेक्षा उलाढाल कमी प्रमाणात झाली. येथे अनुक्रमे १३९२६.५० कोटी आणि ७४२३९.४५ कोटी रुपयांची उलाढाल झाली.
गेले दोन सप्ताह सातत्याने विक्री करीत असलेल्या परकीय वित्त संस्थांनी गतसप्ताहात मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. केंद्र सरकारने परकीय वित्त संस्थांना एकत्रित खरेदीसाठी परवानगी दिल्याने या संस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले; मात्र या एकत्रित खरेदीमध्ये बॅँकिंग क्षेत्रातील गुंतवणुकीच्या परवानगीबाबत संभ्रम असल्याने या क्षेत्राला कमी प्रतिसाद मिळाला.
दरम्यान, बाजाराचा क्षेत्रिय निर्देशांक असलेल्या मिडकॅप निर्देशांकामध्ये चांगली वाढ झाली आहे. या निर्देशांकाने ११,२५२ असा नवीन उच्चांक गाठला आहे. या निर्देशांकामध्ये ३.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. स्मॉल कॅप निर्देशांकही वाढला.
ग्रीसला युरोपियन युनियनने दिलेले मदतीचे नवीन पॅकेज आणि त्याला ग्रीसच्या संसदेची मान्यता आणि इराणने केलेला अणुकरार या दोन बाबींनी जगभरातील शेअर बाजारांमध्ये तेजीचा संचार केला. इराणला आता अधिक तेल उत्पादन करून त्याची निर्यातही करता येणार आहे. यामुळे भारताला स्वस्त खनिज तेल उपलब्ध होऊन चालू खात्यावरील तूट काही प्रमाणात कमी होईल.
जून महिन्यामध्ये देशाची निर्यात सुमारे १५ टक्क्यांनी कमी झाली आहे. सलग सातव्या महिन्यात निर्यात कमी झाल्याने चिंतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर महागाईच्या दरामध्येही वाढ झाल्याने व्याजदरामध्ये कपात होणार की नाही याबाबतही आता संभ्रमाचे वातावरण आहे.
आंतरराष्ट्रीय वातावरणाने बाजारात झाली वाढ
ग्रीसला मिळालेले पॅकेज आणि इराणने केलेला अणुकरार यामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये असलेल्या तेजीचा फायदा भारतीय शेअर बाजारालाही लाभला
By admin | Updated: July 19, 2015 23:17 IST2015-07-19T23:17:20+5:302015-07-19T23:17:20+5:30
ग्रीसला मिळालेले पॅकेज आणि इराणने केलेला अणुकरार यामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये असलेल्या तेजीचा फायदा भारतीय शेअर बाजारालाही लाभला
