Aadhaar Card New Rules 1st Nov: आधार कार्डशी संबंधित नियमांमध्ये १ नोव्हेंबर २०२५ पासून काही मोठे बदल होणार आहेत. जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आवश्यक आहे. आता तुम्हाला आधारमधील तुमची माहिती अपडेट करण्यासाठी नामांकन केंद्रात जाण्याची गरज पडणार नाही.
तुम्ही घरबसल्या ऑनलाइन तुमचं नाव, पत्ता, जन्मतारीख किंवा मोबाईल नंबर यासारखी माहिती बदलू शकता. ही सुविधा आधारला अधिक सोपं आणि सुरक्षित बनवण्यासाठी आणली गेली आहे. त्याचबरोबर, आधारला पॅन कार्डशी जोडणं देखील आता बंधनकारक झालं आहे. जर तुम्ही असे केले नाही, तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होऊ शकतं.
नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
आधार केंद्रात जाण्याची गरज नाही
पहिला मोठा बदल म्हणजे आधारची माहिती अपडेट करणं. यापूर्वी यासाठी तुम्हाला आधार केंद्रात जावं लागत होतं, परंतु आता तुम्ही घरूनच ऑनलाइन सर्व काही अपडेट करू शकता. तुम्ही जी माहिती द्याल, जसं की नाव किंवा पत्ता, ती सरकारी दस्तऐवज जसं की पॅन, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा रेशन कार्डशी आपोआप तपासून पाहिली जाईल. यामुळे अपडेट करण्याची प्रक्रिया वेगवान, सोपी आणि सुरक्षित होईल.
अपडेटसाठी शुल्क
यापूर्वी केंद्रावर जाऊन लांब रांगेत उभं राहावं लागत होतं, पण आता हे काम काही मिनिटांत होईल. आधार केंद्रांवर आधार अपडेट करण्याची फी देखील बदलली आहे. नाव, पत्ता किंवा मोबाईल नंबर बदलण्यासाठी ₹७५ लागतील. जर तुम्हाला फिंगरप्रिंट, डोळ्यांचे स्कॅनिंग किंवा फोटो अपडेट करायचा असेल, तर ₹१२५ द्यावे लागतील. लहान मुलांसाठी ५ ते ७ वर्षे आणि १५ ते १७ वर्षांच्या वयात बायोमेट्रिक अपडेट करणं विनामूल्य आहे. ऑनलाइन दस्तऐवज अपडेट करण्याची सुविधा १४ जून २०२६ पर्यंत विनामूल्य आहे, पण केंद्रावर यासाठी ₹७५ लागतील. आधार कार्डची प्रिंट काढण्याची फी ₹४० आहे. जर तुम्हाला घरी नामांकन हवं असेल, तर पहिल्या व्यक्तीसाठी ₹७०० आणि त्याच पत्त्यावर प्रत्येक अतिरिक्त व्यक्तीसाठी ₹३५० लागतील.
आधार-पॅन लिंक करणं बंधनकारक
याव्यतिरिक्त आणखी एक बदल आहे आणि तो म्हणजे आधार-पॅन लिंकिंग. आता प्रत्येक पॅन धारकाला ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत आपलं पॅन आधारशी जोडावे लागेल. जर तुम्ही असं केलं नाही, तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल, म्हणजेच तुम्ही त्याचा वापर करू शकणार नाही. नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करणाऱ्यांना देखील आधार पडताळणी करावी लागेल.
याशिवाय, बँका आणि इतर वित्तीय संस्थांसाठी केवायसी प्रक्रिया देखील सोपी केली गेली आहे. आता केवायसीसाठी आधार ओटीपी, व्हिडिओ केवायसी किंवा समोरासमोर पडताळणीचा वापर होईल. हे सर्व पेपरलेस आणि वेगवान आहे.
या बदलांमुळे आधार धारकांना खूप फायदा होईल. घरबसल्या अद्ययावत करण्याची सुविधा वेळ वाचवेल. परंतु लक्षात ठेवा, जर तुमचे पॅन आधारशी जोडलेलं नसेल, तर नंतर अडचण येऊ शकते. त्यामुळे लवकरच आपलं आधार आणि पॅन लिंक करून घ्या. ऑनलाइन सुविधांचा वापर करा आणि आवश्यक दस्तऐवज तयार ठेवा. यूआयडीएआयनं हे पाऊल तुमच्या सोयी आणि सुरक्षेसाठी उचललं आहेत.
