Lokmat Money > बिझनेस न्यूज > मला भारतात परतायचेय

मला भारतात परतायचेय

भारतीय प्रशासनाने पासपोर्ट रद्द केल्यामुळे परतता येत नसल्याचे मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी शुक्रवारी दिल्ली न्यायालयाला कळविले.

By admin | Updated: September 10, 2016 04:06 IST2016-09-10T04:06:25+5:302016-09-10T04:06:25+5:30

भारतीय प्रशासनाने पासपोर्ट रद्द केल्यामुळे परतता येत नसल्याचे मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी शुक्रवारी दिल्ली न्यायालयाला कळविले.

I want to return to India | मला भारतात परतायचेय

मला भारतात परतायचेय


नवी दिल्ली : मी भारतात परतू इच्छितो; परंतु भारतीय प्रशासनाने पासपोर्ट रद्द केल्यामुळे परतता येत नसल्याचे मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी शुक्रवारी दिल्ली न्यायालयाला कळविले. अनेक बँकांची हजारो कोटींची कर्जे थकविणारे मल्ल्या सध्या ब्रिटनमध्ये असल्याचे सांगण्यात येते.
परदेशी चलन नियमन कायद्याच्या (फेरा) उल्लंघनप्रकरणी समन्स टाळल्याबद्दल मल्ल्यांविरुद्ध मुख्य महानगरदंडाधिकारी सुमित दास यांच्या न्यायालयात खटला सुरू आहे. सुनावणीला वैयक्तिक हजेरीपासून दिलेली सूट न्यायालयाने नऊ जुलै रोजी रद्द केली होती. त्यानंतरही ते हजर झाले नाहीत. मल्ल्यांच्या वकिलांनी त्यांच्या गैरहजेरीचे वरीलप्रमाणे कारण सांगितले. वरिष्ठ विधिज्ञ रमेश गुप्ता यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज करून मल्ल्या यांनी आपल्याला उपस्थितीसाठी थोडा अवधी देण्यात यावा, अशी विनंती केली आहे. मल्ल्या यांनी पाठविलेल्या ई-मेलची प्रत गुप्ता यांनी न्यायालयात सादर केली. आपल्याला म्हणणे मांडण्याची संधी न देताच २३ एप्रिल २०१६ रोजी आपला पासपोर्ट रद्द करण्यात आला, अशी तक्रार मल्ल्या यांनी या ई-मेलमध्ये केला आहे. सक्तवसुली संचालनालयाने मल्ल्या यांच्या अर्जावर म्हणणे मांडण्यास थोडा अवधी देण्याची मागणी न्यायालयाला केली. न्यायालयाने या प्रकरणी पुढील सुनावणी चार आॅक्टोबरला ठेवली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>आतापर्यंत चारवेळा समन्स बजावले
फॉर्म्युला वनप्रकरणी मल्ल्यांना आपण चार वेळा समन्स बजावले होते; मात्र ते आपल्यासमोर हजर न झाल्यामुळे ८ मार्च २००० रोजी त्यांच्याविरुद्ध न्यायालयात तक्रार दाखल केली आणि नंतर फेराखाली त्यांच्याविरुद्ध आरोप निश्चित केले, असे ईडीच्या सूत्रांनी सांगितले.

Web Title: I want to return to India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.