Cheapest Home Loan: रिझर्व्ह बँकेनं (RBI) आपल्या पतधोरण समितीच्या बैठकीत व्याजदरात म्हणजेच रेपो दरात ०.५० टक्के कपात केल्यापासून बँकांनीही गृहकर्जाचे दर कमी केलेत. जर तुम्हीही गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ते तुम्हाला अगदी स्वस्त दरातही मिळू शकतं. देशातील आघाडीच्या सरकारी बँका स्वस्तदरात गृहकर्ज उपलब्ध करून देत आहेत. मात्र, त्यासाठी तुमचा सिबिल स्कोअर खूप मजबूत असायला हवा. गृहकर्जावरील व्याजदर ठरविण्याचा अंतिम निर्णय बँकेचा असतो. सर्वात कमी व्याजदरानं मिळणाऱ्या ५ सरकारी बँकांच्या गृहकर्जाबाबत जाणून घेऊ.
युनियन बँक ऑफ इंडिया
आपण सार्वजनिक क्षेत्रातील युनियन बँक ऑफ इंडियाकडून गृहकर्जाचा विचार करू शकता. बँक केवळ ७.३५ टक्के सुरुवातीच्या व्याजदरानं गृहकर्ज देत आहे. प्रोसेसिंग फीबद्दल बोलायचं झाले तर तुम्हाला कर्जाच्या रकमेच्या ०.५० टक्के, जास्तीत जास्त १५,००० रुपये + जीएसटी भरावा लागेल.
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
सेंट्रल बँक ऑफ इंडिया
सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून ७.३५ टक्के स्वस्त व्याजदरानं गृहकर्जासाठी अर्ज करता येईल. जर तुमचा सिबिल स्कोअर ८०० किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर सर्वात स्वस्त व्याजदरात गृहकर्ज मिळणं खूप सोपं होईल. या कर्जासाठी प्रोसेसिंग फी म्हणून तुम्हाला कर्जाच्या रकमेच्या ०.५०% म्हणजेच जास्तीत जास्त २०,००० रुपये + जीएसटी भरावा लागेल.
बँक ऑफ महाराष्ट्र
सार्वजनिक क्षेत्रातील बँक म्हणून बँक ऑफ महाराष्ट्र ७.३५ टक्के व्याजदरानं गृहकर्ज देत आहे. बँक महिला आणि संरक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना गृहकर्जावर ०.०५ टक्के अतिरिक्त सवलत देत आहे. गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांना कार आणि एज्युकेशन लोन घेतल्यास सवलत मिळेल, असं बँकेचं म्हणणं आहे.
कॅनरा बँक
सार्वजनिक क्षेत्रातील दिग्गज कॅनरा बँकही स्वस्त दरात गृहकर्ज देत आहे. या बँकेतून तुम्ही केवळ ७.४० टक्के सुरुवातीच्या व्याजदराने गृहकर्ज घेऊ शकता. येथून गृहकर्जासाठी अर्ज केल्यास प्रक्रिया शुल्क म्हणून ०.५०% (किमान १५००+ जीएसटी ते कमाल रु. १०,०००+ जीएसटी) भरावे लागेल.
स्टेट बँक ऑफ इंडिया
देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) सध्या ७.५० टक्के व्याजदरानं गृहकर्ज देत आहे. कर्जाच्या रकमेच्या ०.३५% + जीएसटी प्रोसेसिंग फी म्हणून भरावी लागेल.