>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली - जनावरांना होणारे आजार आटोक्यात आणण्यासाठी आणि दुधाच्या उत्पादनाला चालना मिळावी यासाठी कृषी खात्याने अॅनिमल हेल्थ कार्ड आणि राष्ट्रीय गोकूळ मिशनमध्ये जास्त निधीची मागणी केली आहे. बजेटपूर्व अपेक्षांमध्ये कृषी व सहकार खात्याने पशू संजीवनी स्कीम या योजनेची मागणी केली असून यामध्ये हेल्थ कार्ड, आपत्कालीन हेल्पलाईन आणि घराघरात आरोग्य सेवा यांचा समावेश आहे.
या योजनेमध्ये दुग्धोत्पादन करणा-या 8.5 कोटी पशूंना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी 140 कोटी रुपयांच्या निधीची मागणी कृषि खात्याने केली आहे, असे समजते. पशूंना होणा-या आजारांना आळा घातला तर उत्पादनक्षमताही वाढेल असे नमूद करण्यात आले आहे.
प्रत्येक संबंधित पशूला एक ओळख क्रमांक दिला जाईल आणि त्याची माहिती राष्ट्रीय डेटा बेसमध्ये गोळा केली जाईल. त्याआधारे प्रत्येक उपयुक्त दुग्धोत्पादक पशूला आरोग्य सेवा घरपोट पुरवली जाईल अशी ही योजना आहे.
राष्ट्रीय गोकूळ योजनेला जास्त निधी द्यावा आणि दुग्धोत्पादन कसं वाढेल यावर भर द्यावा अशी मागणीही कृषी खात्याने केल्याचे समजते. पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्ये या योजनेसाठी 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.
भारत हा दुग्धोत्पादनात जगातला सगळ्यात मोठा उत्पादक तसेच ग्राहक आहे. 2014 - 15 या आर्थिक वर्षात भारतातील दुधाचे उत्पादन 146.31 दशलक्ष टन झाले होते, जे 2015 - 16 मध्ये वाढून 160 दशलक्ष टन झाले असावे असा अंदाज आहे.